पत्रीपूलाच्या बांधकामासाठी परराज्यातील कामगारांना विमानाने परत आणणार

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कामगार परत येण्यासअनिच्छूक

Updated: Jun 20, 2020, 09:12 PM IST
पत्रीपूलाच्या बांधकामासाठी परराज्यातील कामगारांना विमानाने परत आणणार title=

आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण: लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक विकासकामे सध्या ठप्प झाली आहेत. कल्याणच्या पत्री पूलाच्या कामालाही या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनच्या काळातही पत्रीपूलाचे काम सुरु ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष परवानगी दिली होती. मात्र, दरम्यानच्या काळात अनेक मजूर आपापल्या गावी परतल्याने सध्या पुलाचे काम सध्या रखडले आहे. त्यामुळे आता पत्रीपूलाच्या कंत्राटदाराने कुशल कामगारांना विमानाने मुंबईत आणण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून पत्रीपुलाच्या पुढील बांधकामाला वेग येईल.
 
गेल्या अनेक महिन्यांपासून पत्रीपूलाचे काम सुरू असून कोणत्या न कोणत्या कारणामुळे संथगतीने सुरू आहे. तीन महिन्यांपूर्वी कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ माजवायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा पत्रीपूलाच्या या कामाला फटका बसला. महाराष्ट्रात जसजसा कोरोना वाढू लागला तसतसा सर्व कामगार आपापल्या राज्यात निघून गेले. मात्र आता पत्रीपूलाच्या कामासाठी आवश्यक असणारे कुशल कामगार हे पश्चिम बंगाल, आसाम परिसरात राहायला आहेत. या कामगारांना कंत्राटदाराने येण्यासाठी खास विमानाची, राहण्याची, खाण्याचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच या कामगारांची दररोज स्क्रिनिंगही केले जाणार असल्याचे कंत्राटदाराने सांगितले.

गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या पत्रीपूलाचे काम पूर्ण करण्यासाठी कल्याण-डोंबिवलीकर देव पाण्यात बुडवून बसले आहेत. त्यामुळे कामगारांना ट्रेनने आणा, बसने आणा की विमानाने पण आम्हाला पत्रीपूल पूर्ण करून द्या, अशी अपेक्षा कल्याणकर व्यक्त करत आहेत.

मध्य रेल्वे, आयआयटी आणि कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे २० जुलै २०१९ मध्ये पत्री पूलाचे सुरक्षा ऑडिट करण्यात आले होते. त्यानंतर पादचारी किंवा वाहनांच्या वाहतुकीसाठी हा पूल सुरक्षित नाही, असा अहवाल देण्यात आला होता. या मार्गावरील वाहतूक तातडीने बंद करण्याचे आदेश मध्य रेल्वेने कल्याण-डोंबिवली महापालिकेला दिले होते. यानंतर पत्रीपूल पाडण्यात आला होता.