फोडाफोडी होण्याची भीती, काँग्रेस आमदारांना हलविणार जयपूरला

काँग्रेस आमदारांना जयपूरला हलवण्याच्या तयारी सुरु झाली आहे. 

Updated: Nov 8, 2019, 08:34 AM IST
फोडाफोडी होण्याची भीती, काँग्रेस आमदारांना हलविणार जयपूरला  title=

मुंबई : काँग्रेस आमदारांना जयपूरला हलवण्याच्या तयारी सुरु झाली आहे. मुंबईत काँग्रेस आमदारांची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. आमदारांची फोडाफोडी होण्याची काँग्रेसला भीती आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून काँग्रेसकडून काळजी घेण्यात येत आहे. कर्नाटकात भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना गळाला लावले होते. हा अनुभव असल्याने काँग्रेसने सावधगिरी बाळगली आहे.

भाजप-शिवसेनेतील सत्तासंघर्षाचा तिढा सुटत नसल्याने आमदारांची फोडाफोडी होण्याची भीती काँग्रेसलाही वाटू लागली आहे. भाजपने काँग्रेस आमदारांशी संपर्क सुरू केल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून सर्व आमदारांना जयपूरला पाठवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. आज या सर्व आमदारांना मुंबईत बोलावण्यात आले आहे. मुंबईतून त्यांची रवानगी थेट जयपूरला होणार आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने काँग्रेसनं आमदारांना जयपूरलाच पाठवण्याची तयारी सुरु केली आहे. 

दरम्यान, मातोश्रीवर  गेल्या १८ फेब्रुवारीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंमध्ये बैठक झाली होती. त्या बैठकीत फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार मुख्यमंत्रिपद अडीच अडीच वर्ष वाटून देण्याचे आश्वासन भाजपने शिवसेनेला दिले होते, असा दावा शिवसेना करत आहे. त्या आधारेच शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची मागणी रेटून धरली आहे. पण  भाजपने मात्र शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला आहे. तसेच भाजपकडे १०५ आमदार आहेत. सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे ते सत्ता स्थापन करण्याचा दावा करु शकतात. मात्र, बहुमतासाठी आमदारांची संख्या कमी आहे. त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण होऊ शकते, अशी काँग्रेसला भीती आहे.