काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यायला हवा; हुसेन दलवाईंचे सोनिया गांधींना पत्र

हिंदुत्वाचे राजकारण करणारा शिवसेना पक्ष आता सर्वसमावेश झाला आहे.

Updated: Nov 2, 2019, 11:11 AM IST
काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यायला हवा; हुसेन दलवाईंचे सोनिया गांधींना पत्र title=

मुंबई: राज्यात सत्तास्थापनेवरून सुरु असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून शिवसेनेला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. सध्या शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. राज्यातील पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध केला आहे. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सत्तास्थापनेसाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा, या मताचे आहेत.

काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपीची विचारधारा समान होती का; संजय राऊतांचा सवाल

यानंतर आता हुसेन दलवाई यांनीदेखील शिवसेनेला पाठिंबा देण्याचे समर्थन केले आहे. यासाठी त्यांनी थेट सोनिया गांधी यांना पत्र लिहले आहे. हिंदुत्वाचे राजकारण करणारा शिवसेना पक्ष आता सर्वसमावेश झाला असून सत्तास्थापनेसाठी शिवसनेकडून पाठिंब्यासाठी प्रस्ताव आल्यास शिवसेनेला पाठिंबा द्या, अशी विनंती त्यांनी पत्रात केली आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेने प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता याचीही आठवण दलवाई यांनी करून दिली आहे.

भाजपला राष्ट्रपती म्हणजे काय खिशातला रबरी स्टॅम्प वाटतो का?- शिवसेना

एक पक्ष, एक धर्म, एक राष्ट्र आणि एक नेता ही भाजपची भूमिका हाणून पाडायची असेल तर शिवसेनेला पाठिंबा देणे गरजेचे आहे. भाजपने एकाही मुस्लिम आमदाराला उमेदवारी दिली नव्हती. याउलट शिवसेनेने साबिर शेख यांना मंत्री केले होते. यंदाच्या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांना उमेदवारी दिली. राज्यात भाजपची सत्ता आली तर त्याचा परिणाम काँग्रेसच्या वाढीवर होईल, याकडेही हुसेन दलवाई यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.