चायनीज ऍपवरुन सचिन सावंत यांचा भाजपला जोरदार टोला

सचिन सावंत यांची भाजपवर टीका...

Updated: Aug 25, 2020, 11:57 AM IST
 चायनीज ऍपवरुन सचिन सावंत यांचा भाजपला जोरदार टोला title=
संग्रहित फोटो

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 जून रोजी भारतात टिकटॉक, कॅम स्कॅनर, यूसी ब्राऊजर, शेअरइट, हॅलो यांसारख्या 59 चायनीज ऍप्सवर बंदी घातली. भारतात चायनीज ऍप्सवर बंदी घातल्यानंतर आता आत्मनिर्भर भारत अंतर्गत, भारतात नवीन ऍप्स तयार करण्यात येत आहेत. नरेंद्र मोदींनी चायनीज ऍप्स बॅन केल्यानंतरही भाजपच्या नेत्यांकडून चायनीज ऍपचा वापर केला जात असल्याचं उघड करत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

पंतप्रधान मोदींनी चायनीज ऍप कॅम स्कॅनर भारतात बॅन केल्यानंतरही भाजपकडून याचा वापर केला जात असल्याची बाब अतिशय निंदनीय असल्याचं म्हणत सचिन सावंत यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे. 

पंतप्रधानांनी चीनचं CamScanner ऍप संपूर्ण भारतात बंद केलं होतं की केवळ सामान्य जनतेसाठी बंद केलं होतं, असा सवाल काँग्रेसकडून केला जात आहे. भाजप भारताचा भाग नाही का? की केवळ भाजपसाठी विशेष सवलत दिली आहे? असा खोचक प्रश्नही काँग्रेसकडून विचारला जात आहे. 

महाराष्ट्र यूथ काँग्रेसकडून, भाजपचं एक प्रसिद्धी पत्रक शेअर करण्यात आलं आहे. त्या प्रसिद्धी पत्रकाच्या शेवटी कॅम स्कॅनर ऍपचा वापर केल्याचं दिसत आहे. यावरुन सचिन सावंत यांनी भाजपला चायनीज ऍप बॅन करण्याची कृती म्हणजे केवळ दिखावा केल्याचा टोला लगावला आहे.