काँग्रेसमध्ये विलिनीकरण नाही, राष्ट्रवादी विधानसभेसाठी सज्ज

लोकसभा निवडणुकीतील पराभव मागे टाकून विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता सज्ज होत आहे.  

Updated: Jun 1, 2019, 08:19 PM IST
काँग्रेसमध्ये विलिनीकरण नाही, राष्ट्रवादी विधानसभेसाठी सज्ज title=

कृष्णात पाटील, मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभव मागे टाकून विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता सज्ज होत आहे. मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत विलिनीकरणाची चर्चा मागे टाकून राज्यात दुबळ्या झालेल्या काँग्रेसचा फायदा उचलण्यासाठी निम्या निम्या जागांचा फॉर्म्युला पुढे आणण्याचाही प्रयत्न झाला. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची मरगळ झटकून विधानसभा निवडणुकीला कसे सामोरे जायचे, याची रणनिती आखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभरातील सर्व पदाधिकारी मुंबईत झाडून उपस्थित होते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सर्वांना मार्गदर्शन करत आगामी लढाईसाठी सज्ज राहण्यास सांगितले.  

बैठकीत काय घडले ?

बहुजन वंचित आघाडीच्या प्रभावाविषयी खासकरून चर्चा झाली. २००९ साली विधानसभेच्या राष्ट्रवादीने ११४ काँग्रेसने १७४ जागा लढवल्या होत्या, पण आता वाढलेली ताकद लक्षात घेता निम्या निम्या जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही राहण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत नगरच्या जागेवरून धडा घेत जो जिंकणारा उमेदवार असेल त्याला ती जागा मिळावी हा प्रमुख निष्कर्ष ठेवण्यावर चर्चा झाली. ज्याठिकाणी पक्षाला वारंवार पराभव स्विकारावा लागला आहे त्याठिकाणी नवा आणि तरूण चेहरा देण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जाणार  आहे.

लोकसभेच्या विजयी आणि पराभूत उमेदवारांनी आपली मनोगत मांडून काय चुकले,  कुणी दगाफटका केला याचा ऊहापोह केला. फक्त मावळचे पार्थ पवार आणि कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले नाही. बहुजन वंचित आघाडीचा फटका, विरोधकांनी धार्मिकतेच्या नावावर केलेले मतांचे ध्रुवीकरण, पंतप्रधान पदासाठी नसलेला चेहरा, नवमतदारांचे मोदी आकर्षण ही काही पराभवाची कारणे शोधली गेली. लोकसभा निवडणुकीत घडलं तेच विधानसभा निवडणुकीत होईल, असं नाही हे उदाहरणासह नेत्यांच्या मनावर बिंबवण्यात आले. १०० दिवसांचा कार्यक्रम तयार करून अधिकाधिक जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जाईल

विलिनीकरण नव्हे तर मजबुतीकरण

राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याच्या केवळ अफवा असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. तर विलिनीकरणाची पुडी ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित राहू न वाटणा-यांनी पत्रकारांमार्फत सोडल्याचे शरद पवारांना बैठकीत सांगितले. पक्ष मजबूत करण्यासाठी शरद पवारांनी नेत्यांना मार्गदर्शन केले. शिवसेना भाजपनं विरोधात असताना ज्याप्रमाणे पक्ष मजबूत केला. तशाच प्रकारे काम करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

लोकसभा निवडणुकीत विजयी आणि पराभूत झालेल्या जागांविषयी सखोल चिंतन यावेळी करण्यात आले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यात काँग्रेस अद्याप चाचपडत असताना दुसरीकडे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करत एक पाऊल पुढं टाकलंय.विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला टक्कर तर द्यायचीच आहे शिवाय राज्यात दुबळ्या पडलेल्या काँग्रेसच्या स्थितीचा फायदाही राष्ट्रवादी काँग्रेसला उचलायचा आहे. यासाठी पराभव विसरून पक्षात नवे चैतन्य आणण्याचे काम सध्या सुरु आहे.