आजही काँग्रेस आपल्याला शत्रू मानते! राष्ट्रवादीच्या बैठकीत काँग्रेसबद्दल नाराजीचा सूर

ओबीसी जागेवर ओबीसी उमेदवारच द्यायची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीत ठरवली

Updated: Sep 8, 2021, 04:27 PM IST
आजही काँग्रेस आपल्याला शत्रू मानते! राष्ट्रवादीच्या बैठकीत काँग्रेसबद्दल नाराजीचा सूर title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस बोलवलेल्या बैठकीत काँग्रेसबद्दल नाराजीचा सूर उमटला. गेल्या अनेक वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सत्तेत आहे, अनेक निवडणुका दोन्ही पक्षांनी एकत्र लढवल्या मात्र तरीही काँग्रेस आपल्याला शत्रू मानत असल्याचा सूर राष्ट्रवादीच्या बैठकीत उमटल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

त्याचबरोबर शिवसेना आणि काँग्रेसचे मंत्री राष्ट्रवादीच्या आमदारांची कामं करत नसल्याची तक्रारही या बैठकीत राष्ट्रवादीच्या काही आजी-माजी आमदारांनी केली. या नाराजीला पक्षाचे प्रमुख प्रवक्ते नवाब मलिक यांनीही दुजोरा दिला आहे. तीन पक्षाचे सरकार असताना प्रत्येक पक्ष आपल्या आमदारांना झुकतं माप देतो. दोन पक्षांचं सरकार होतं तेव्हाही अशा तक्रारी होत्या. एक पक्षाचं सरकार असलं तरी नाराजी असतेच. आमदारांची सर्व काम होतीलच असं नाही, अशी प्रतिक्रिया याप्रकरणी नवाब मलिक यांनी दिलीय.

राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2019 च्या निवडणुकीतील विजय झालेल्या आणि पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक बोलवली होती. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे पार पडलेल्या या बैठकीला पक्षाचे सर्व मंत्री आणि प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते.

साडे पाच तास चाललेल्या या बैठकीत 55 जणांनी आपली मतं मांडली. विशेषतः जिल्ह्यातील परिस्थिती, तिथली प्रलंबित विकास कामं, त्याचा पाठपुरावा आणि जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर या बैठकीत चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक परिस्थितीनुसार आघाडी वा युती करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. याशिवाय ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरही या बैठकीत चर्चा झाली. 

जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत निवडणूका पुढे ढकलण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे. पण घटनादुरुस्तीमुळे निवडणुका फार काळ टाळता येणार नाहीत. काही लोकं निवडणुका घ्याव्यात म्हणून सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. जर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तर निवडणूका टाळता येणार नाहीत, अशा परिस्थितीत ओबीसी जागेवर ओबीसीच उमेदवार द्यायचा अशी भूमिका राष्ट्रवादीने आजच्या बैठकीत ठरवली आहे.