मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर कॉलेजेस सुरू झाली. आता पावसालाही सुरूवात झालीय. त्यामुळे विद्यार्थ्यांचं कॉलेज बंकिंग वाढतं. मात्र आता बंकींग करायच्या आधी सावधान. कारण तुम्ही लेक्चर बंक केलंत की तुमच्या पालकांना मेसेज जाणार आहे.
मुंबईतील साठ्ये, केसी, मंजूनाथ, रुईया, रुपारेल, अशा कॉलेजनी विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीवर लगाम घालण्यासाठी लाईव्ह रिपोर्ट्स अटेंडंस अॅपची स्मार्ट कल्पना अंमलात आणली आहे. या अॅपमध्ये एक लॉग इन शिक्षकांसाठी तर दुसरं लॉग इन पालकांसाठी आहे. कॉलेज पालकांना आयडी आणि पासवर्ड पुरवते. शिक्षक क्लासरुममध्ये या अॅपच्या माध्यमातूनच हजेरी घेतात. कोण हजर कोण गैरहजर सगळ्यांचा रेकॉर्ड या अॅपमध्ये असतो. पालकांनी आपल्या मोबईलमध्ये हे अॅप सुरु केल्यावर आपल्या पाल्याने दिवसभरात किती लेक्चर्स अटेंड केली याचा मेसेज पालकांना जातो.
विद्यापीठाच्या नियमानुसार वर्षभरात एका विद्यार्थ्यांची हजेरी ७५% नसेल तर त्याला परीक्षेला बसता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी लेक्चरला बसले तर त्याचा फायदा त्यांनाच होणार आहे. त्यामुळे हे अॅप आत्ता जाच वाटत असला तरी त्यांच्याच भल्यासाठी आहे.