दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी बैठकीला न येण्याबाबत राज्यपालांना कळवलं आहे. कालच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना भेटून राज्य सरकारविरुद्ध तक्रार केली होती. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. पण मुख्यमंत्र्यांनी या बैठकीला जाणार नसल्याचं राज्यपालांना कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजभवनावरील बैठकीला शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित आहेत.
राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करत कालच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांसोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती.
'स्थलांतरित मजुरांची प्रचंड हेळसांड होत आहे. शेतमाल खरेदी न करण्यासह शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. गरिबांना रेशनधान्य मिळत नाही. आरोग्यव्यवस्थाही पूर्णपणे कोलमडली आहे. रुग्णसंख्या लपवली जात आहे. मृतदेहांबाबत प्रोटोकॉलचं पालन होत नाही. राज्यातील सरकरा पूर्णत: अपयशी ठरलं आहे,' असे आरोप भाजपने राज्यपालांच्या भेटीत केले.
स्थलांतरित मजुरांची प्रचंड हेळसांड, शेतमाल खरेदी न करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्या,गरिबांना रेशनधान्य न मिळणे, आरोग्यव्यवस्था पूर्णतः कोलमडली असणे, रुग्णसंख्या लपविणे, मृतदेहांबाबत प्रोटोकॉलचे पालन न करणे अशा अनेक आघाड्यांवर राज्यातील सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे. pic.twitter.com/q8ks0d8NlO
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 19, 2020
राज्य सरकारने पॅकेज दिलं पाहिजे, तसंच बारा बलुतेदारांचा विचारही केला गेला पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. शरद पवार नरेंद्र मोदींना मदतीसाठी पत्र लिहितात, तसंच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही एखादं पत्र लिहावं, असा टोला फडणवीस यांनी लगावला होता.