आदेशानंतरही कंगनाविरोधात शिवसैनिकांचं आंदोलन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज

कंगना राणौतविरुद्ध शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत. 

Updated: Sep 9, 2020, 04:34 PM IST
आदेशानंतरही कंगनाविरोधात शिवसैनिकांचं आंदोलन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज title=

मुंबई : कंगना राणौतविरुद्ध शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत. सूचना देऊनही आंदोलन केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कंगना राणौत आज मुंबईमध्ये दाखल झाली, त्यावेळी विमानतळावर शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेनं कंगनाविरोधात आंदोलन केलं. विमानतळावर भारतीय कामगार सेनेचे सदस्य उपस्थित होते. यावेळी कंगनाविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. 

कंगनाविरोधात विमानतळावर कोणतंही आंदोलन करू नका, असा आदेश शिवसेना नेतृत्वाने पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला होता. विमानतळावर आंदोलन झाल्यास त्याची सहानुभूती कंगनाला मिळेल, अशी शिवसेना नेतृत्वाची भावना आहे. कंगनाविरोधात कायदेशीर कारवाई हीच व्यूहरचना शिवसेनेनं आखल्याची माहिती आहे. 

दुसरीकडे कंगनाच्या विषयावर बोलू नका, असे सक्त आदेश मातोश्रीवरुन पक्षनेते आणि नवनियुक्त प्रवक्त्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कंगनाच्या कार्यालयावर बीएमसीने हातोडा चालवला, त्यावरही न बोलण्याचं शिवसेनेने नेत्यांना सांगितलं आहे. मुंबई मनपाची कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप भाजपने केला, पण कंगनाप्रकरणी शिवसेनेने आज मौनच बाळगलं. संजय राऊत यांनीही या वादावर बोलण्यास नकार दिला.