दीपक भातुसे, मुंबई : नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतील सर्व आमदारांची भेट घेणार आहेत. तीनही पक्षांच्या आमदारबरोबर मुख्यमंत्र्यांची डिनर डिप्लोमसी असणार आहे. महाविकास आघाडीतील आमदारांच्या उद्यापासून तीन दिवस बैठका होणार आहेत. उद्या संध्याकाळी साडे सात वाजता पहिली बैठक होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री विभागवार आमदारांना भेटणार आहेत.
दुपारी १२ वाजता वर्षा बंगल्यावर शिवसेनेची बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेची ही पहीलीच मंत्री व पदाधिका-यांची एकत्रित बैठक होते आहे. या बैठकीत राज्यात शिवसेना पक्ष अधिक बळकट करण्यासाठी महत्वाची चर्चा होणार आहे.
नुकताच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील यशअपयशाचा आढावा घेतला जाईल आणि राज्यातील पाच महानगरपालिकांच्या होणा-या निवडणुकांसाठी शिवसेनेची रणनिती ही या बैठकीत ठरू शकते.
मात्र या बैठकीत सध्या वादात सापडलेले वनमंत्री संजय राठोड उपस्थित रहाणार का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.