श्रीकांत शिंदेंच्या सुरक्षेसाठी ठाण्यातील निवासस्थानचा रस्ता नागरिकांसाठी बंद, 'पोलिसांच्या अतिउत्साहामुळे...'

CM Shinde Thane Residence Road: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या येण्या-जाण्याचा मार्ग असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी हा सर्विस रस्ता बंद करण्यात आला होता.

Updated: Nov 2, 2023, 12:19 PM IST
श्रीकांत शिंदेंच्या सुरक्षेसाठी ठाण्यातील निवासस्थानचा रस्ता नागरिकांसाठी बंद, 'पोलिसांच्या अतिउत्साहामुळे...' title=

CM Shinde Thane Residence Road: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे शहरातील खासगी निवासस्थान असलेल्या लुईसवाडी येथील सर्विस रस्ता सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ठाणे वाहतूक पोलिसांना नागरिकांना वाहतूकीसाठी हा बंद करण्यात आल्याचे नोटिफिकेशन काढले. यानंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. सोशल मीडियामध्ये ट्रोलिंग सुरु झाले. दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भात ठाणे वाहतूक पोलिसांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी काय लिहिले आहे? पत्रानंतर ठाणे पोलीस कोणत्या निर्णयावर पोहोचले? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या येण्या-जाण्याचा मार्ग असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी हा सर्विस रस्ता बंद करण्यात आला. ठाणे वाहतूक पोलिसांच्या नोटिफिकेशनमध्ये असा उल्लेख करण्यात आला होता. याची माहीती खासदार श्रीकांत शिंदे यांना झाली. यानंतर श्रीकांत शिंदे यांनी नोटिफिकेशन काढणाऱ्या संबंधित वाहतूक पोलिसाची चांगलीच खरडपट्टी काढली. 

वाहतूक पोलिसांना कोणतीही कल्पना न देता परस्पर काढलेल्या या अधिसूचना पत्राबद्दल श्रीकांत शिंदे यांनी जाब विचारला. आपल्याला अशा प्रकारचे व्हीआयपी कल्चर मान्य नसल्याचे सांगत त्यांनी नोटिफिकेशन रद्द करण्याची सूचना केली. त्यानंतर आता ठाणे पोलिसांनी हे नोटिफिकेश रद्द केले असून सर्विस रस्ता पूर्वी प्रमाणे नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. 

काय म्हणाले श्रीकांत शिंदे?

ठाणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने आमचे शुभदिप हे निवासस्थान असलेल्या लुईसवाडी परिसरातील वाहतूक बदलांसाठीचे एक परिपत्रक बुधवारी जारी केले आहे. त्या पत्रकात मा. मुख्यमंत्र्यांचे कुटुंबियांसाठी म्हणजे आमच्यासाठी वाहतूक बदल प्रस्तावित केल्याचा उल्लेख आहे. त्यात माझ्या नावाचाही स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. अशा पध्दतीने आमच्या निवासस्थान परिसरातील वाहतूकीत बदल करण्याबाबतची कोणतीही विनंती किंवा सूचना मी किंवा आमच्या कुटुंबियांनी केलेली नव्हती. तसेच, अशा पद्धतीने पत्रक जारी करण्यापूर्वी आम्हाला पूर्वकल्पनाही देण्यात आली नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. 

वाहतूक विभागाचे अतिउत्साही पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी परस्पर काढलेल्या या पत्रामुळे प्रसिध्दी माध्यमे आणि सोशल मीडीयावर आमच्या कुटुंबियांची नाहक बदनामी केली जात आहे. चूक पोलिसांची आणि खापर आमच्या माथी अशी अत्यंत संतापजनक परिस्थिती त्यामुळे उद्भवली आहे. आमचे येणे- जाणे सुकर व्हावे यासाठी सर्वसामान्य जनतेचा रस्ता अडविण्याचा अधिकार आम्हाला मुळीच नाही. ते व्हीआयपी कल्चर आम्हाला मुळीच मान्य नसल्याचे ते म्हणाले. तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव अशा पद्धतीने वाहतूक बदल करून ठाणेकरांना त्रास होत असेल तर पोलिसांचे हे प्रयत्नही अनाकलनीय आहे. लोकांचे दैनंदिन जगणे सुसह्य करणे हे लोकप्रतिनिधींचे आणि पोलिसांचेही कर्तव्य असते. त्यांच्या जगण्यात अडथळे निर्माण करणे आपल्याला निश्चितच शोभणारे नाही. आमची सुरक्षेसाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेतोय. परंतु, पोलिसांनी उत्साहाच्या भरात अशा पद्धतीने वाहतूक बदल करण्याचा जो प्रताप केला आहे तो निश्चितच योग्य नसल्य.ाचे त्यांनी स्पष्ट केले. 

पोलिसांच्या या पत्रकबाजीमुळे  आमच्या कुटुंबियांना जो मनस्ताप सहन करावा लागलाय याची कल्पना पत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्यांना कदाचीत नसावी. त्यामुळे आम्हाला कोणतीही कल्पना नसताना परस्पर अशा पद्धतीने वाहतूक बदलाचे परिपत्रक काढणारे पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड यांच्यावर आपण तातडीने कठोर कारवाई करावी,अशी मागणी श्रीकांत शिंदे यांनी केली. तसेच, यापुढे अशा पद्धतीने कोणतेही परिपत्रक काढले जाणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.