मुंबई: विरोधकांनी दुष्काळाच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांची दिशाभूल करु नये. राज्यातील समस्यांबाबत विरोधकांनी गंभीर झाले पाहिजे. शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशाप्रकारे नव्हे तर त्यांनी धीर देणारी वक्तव्ये करावीत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे कान टोचले.
ते रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. तत्पूर्वी झालेल्या विरोधकांच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' असे संबोधत त्यांची खिल्ली उडवण्यात आली होती. याचा समाचार घेताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना पोरकटपणा थांबवण्याचा सल्ला दिला. विरोधकांकडे बोलण्यासाठी काहीही शिल्लक नसल्यामुळे त्यांना फिल्मी स्टाईलचा वापर करावा लागत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
राज्यात सरासरी ७४ % पाऊस पडला असून मराठवाड्यात ५० टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे. या सगळ्या निकषांचा अभ्यास करून अगदी वेळेत राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे. साडेसात हजार कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात आला आहे. विरोधक मात्र दुष्काळाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी न झाल्याची ओरड करत आहेत. मात्र, तीव्रता वाढेल तशी सरकार योग्य ती पावले उचलेल. पहिल्या टप्प्यात डिसेंबर, डिसेंबर ते मार्च दुसरा आणि त्यानंत पाऊस पडेपर्यंत या तीव्रतेनुासर सर्व उपाययोजना अंमलात आणल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तसेच बोंडअळीग्रस्त ३५ हजार शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळाली आहे. यासाठी तब्बल २२०० कोटी रुपये खर्च करण्यात आला. यापूर्वीच्या सरकारने बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना याच्या निम्मी मदतही दिली नव्हती, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्रच नंबर १
औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकीत कर्नाटकने महाराष्ट्राला मागे टाकल्याच्या आरोपालाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उत्तर दिले. विरोधकांनी खरे आकडे देऊन एखादी गोष्ट मांडली तर ते योग्यच आहे. मात्र, सध्या विरोधक चुकीचे आकडे देऊन महाराष्ट्राची बदनामी करताहेत. यामध्ये त्यांना आनंद मिळतोय. मात्र, रिझर्व्ह बँकेची कोणतीही आकडेवारी काढून बघितल्यास औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्रच नंबर १ असल्याचे सिद्ध होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.