मुंबई : अरबी समुद्रालगत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या राज्यात ढगाळ वातावारण निर्माण झाले आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र कोकण, गोवा येथे तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पुढील दोन दिवसता हवामान पूर्वस्थितीत येईल, असे पुणे वेधशाळेने सांगितले आहे. मात्र पुढील आठवड्यात पुन्हा एकदा राज्यात ढगाळ हवामानाची आणि पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
दरम्यान, राज्यातील हवामान ढगाळ झाल्याने निर्यातक्षम द्राक्षाचे दर कोसळले आहेत. ८०ते ९० रुपये मिळणारे दर ५० ते ६० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. कमी दराने द्राक्ष विकावी लागत असल्याने उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे हे दर अधिकच पडण्याची शक्यता आहे.
बदलत्या हवामानाचा आंबा आणि काजू उत्पादकांनाही फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आंबा आणि काजूवर काळे डाग पडण्याची शक्यता अधिक असून रोगाचा प्रादूर्भावर वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात आलेय. त्यामुळे आंबा बागायतदार हातचे पिक जाणार याच्या चिंतेत आहेत.