'शिर्डीचा वाद म्हणजे सर्वसमावेशक देव, प्रतीकं हिरावून घेण्याचा डाव'

मुख्यमंत्र्यांकडून शिर्डी विरुद्ध पाथरी वादावर आज तोडगा काढली जाण्याची शक्यता आहे. 

Updated: Jan 20, 2020, 10:33 AM IST
'शिर्डीचा वाद म्हणजे सर्वसमावेशक देव, प्रतीकं हिरावून घेण्याचा डाव' title=

मुंबई: साईबाबांच्या जन्मस्थळावरून सध्या सुरु असलेला वाद हा म्हणजे देशातील सर्वसमावेशक देव आणि प्रतीकांचे अपहरण करण्याचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसच नेते सत्यजित तांबे यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिर्डी आणि पाथरीकरांमध्ये साईबाबांच्या जन्मस्थळावरून वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थान असल्याचे सांगत पाथरीच्या विकासासाठी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, शिर्डीकरांनी पाथरी साईबाबांचे जन्मस्थान असल्याच्या गोष्टीचा इन्कार केला होता. याविरोधात शिर्डीत बेमुदत बंदही पुकारण्यात आला आहे. त्यामुळे हा वाद सध्या चांगलाच तापला आहे. 

या पार्श्वभूमीवर सत्यजित तांबे यांनी सोमवारी ट्विट केले. यामध्ये सत्यजित तांबे यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. शिर्डीचा वाद म्हणजे सर्वसमावेशक देव आणि प्रतिके हिरावून घेण्याचा डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

शिर्डी विरुद्ध पाथरी हा वाद फक्त आर्थिक नाही. साईबाबा हे सर्वसमावेशक संत, देव मानले जातात. विसाव्या शतकात हा लोकांनी त्यांच्यासाठी निर्माण केलेला सर्वधर्मी देव आहे. त्यांचं जन्मगाव, त्यांचा धर्म आणि त्यांची जात याबद्दल दावे केले जात आहे. बाबांनी त्यांच्या हयातीत ते कोण ,कुठले ही माहिती कुणालाही दिली नव्हती. मात्र, २१व्या शतकात त्यांची जात, धर्म याबद्दल दावे केले जात आहेत. हे सरळ साधे प्रकरण नाही. यामागे सर्वसमावेशक देव, प्रतीकं यांचे अपहरण करण्याचा हा डाव असल्याचे तांबे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शिर्डी विरुद्ध पाथरी वादावर तोडगा काढली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी आज महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला शिर्डीतून माजी शहराध्यक्ष कैलास कोते, शिवाजी गोंदकर, राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित राहणार आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x