Coronavirus : मुंबईकरांसाठी मोठा दिलासा, पण धोका कायम

वाचा सविस्तर वृत्त   

Updated: Jul 29, 2020, 12:09 PM IST
Coronavirus : मुंबईकरांसाठी मोठा दिलासा, पण धोका कायम title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : देशभरात coronavirus कोरोनाचा कहर पाहायला मिळत असतानाच इथं सर्वाधिक रुग्णसंख्या वाढीचा वेग असणाऱ्या मुंबईत मात्र परिस्थिती काहीशी नियंत्रणात येताना दिसत आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या SERO सर्व्हेतून ही बाब निदर्शनास आली आहे. 

सदर सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार झोपडपट्टी भागात राहणाऱ्या साधारण ५७ टक्के नागरिकांना कोरोनाची लागण होऊन गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामध्ये वडाळा, मानखुर्द, दहिसर, बोरिवली या भागातील नागरिकांचा सर्वाधिक समावेश आहे. याव्यतिरिक्त बिगर झोपडपट्टी भागातील सरासरी सुमारे १६ टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याचं निष्पन्न झालं आहे. 

मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी झी २४तासशी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार, ही मुंबईकरांसाठी अतिशय चांगली बातमी आहे. मुंबईच्या झोपडपट्टी भागामधील ५७ टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्यामुळं त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता फार कमी असल्याचं ते म्हणाले. परिणामी या नागरिकांना कोरोनापासून मुक्ती मिळाली असली तरीही त्यांनी अधिक काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ज्यामध्ये दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखणं, मास्क लावणं, स्वच्छता राखणं या प्राथमिक गोष्टींवर काकाणी यांनी भर दिला. 

महिलांना धोका कमी... 

सुरुवातीपासूनच्या संशोधनाचा संदर्भ देत आयुक्तांनी महिलांमध्ये कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण कमी असल्याची बाब अधोरेखित केली. महिलांची रोगप्रतिकारक शक्ती तुलनेनं चांगली असल्याचं म्हणत त्यांनी हा मुद्दा मांडला. 

मुंबईकरांची हर्ड इम्युनिटी वाढली 

सेरो सर्व्हेतून समोर आलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीला मुंबईकरांची सामूदायिक रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याचं निदर्शनास येत आहे. यालाच हर्ड इम्युनिटी असंही म्हटलं जातं.