मुंबई : पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा चुनाभट्टी ते बीकेसी हा उड्डाणपूल पूर्ण झाला असून शनिवारी दुपारनंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. आज या पुलावर कामगार अखेरचा हात फिरवत आहेत. या ठिकाणी स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत या पुलाची पाहणी केली. आणि उद्या दुपारनंतर हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितले.
या पुलाची मुख्य कामे पूर्ण झाली असून काही छोटी-मोठी कामे उद्या दुपारपर्यंत पूर्ण होतील, आणि दुपारी तीननंतर कुठल्याही क्षणी हा पूल नागरिकांसाठी सुरू करण्यात येईल. उड्डाणपुलाच्या श्रेयावरून हा उड्डाणपूल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिवाळीच्या दिवशी खुला करण्यात येणार असल्याचे सांगत आंदोलन केलं होते. परंतु त्यावेळी या पुलाचे काम अपूर्ण असल्याने हा पूल सुरू करण्यात आला नव्हता.
स्थानिक शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी या पुलाचा सतत पाठपुरावा केला असल्याचे सांगत हा पूल कोणताही गाजावाजा न करता उद्या खुला केला जाईल, अशी माहिती दिली.