चित्रा वाघ नवाब मलिक यांना का म्हणतायत, 'तुम्ही करा रे कितीही हल्ला'

धर्मांतराचा आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांचा चित्रा वाघ यांनी समाचार घेतला आहे

Updated: Oct 26, 2021, 04:34 PM IST
चित्रा वाघ नवाब मलिक यांना का म्हणतायत, 'तुम्ही करा रे कितीही हल्ला' title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे Zonal Director समीर वानखेडे यांच्यावर धर्मांतराचा आरोप केला आहे. समीर वानखेडे यांचा जन्म दाखला जात पडताळणी समितीसमोर देणार असून सत्य काय ते बाहेर येईल असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. समीर वानखेडे यांनी बोगस जन्म दाखल तयार करुन शेड्यूल कास्टच्या कॅटेगरीत नोकरी मिळवली असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी समाचार घेतला आहे. त्यांनी ट्विट करत एक कविता पोस्ट केली आहे. 'तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला' असं म्हणत चित्रा वाघ यांनी #ISupportSameerWakhende असा हॅश टॅग दिला आहे.

त्याचबरोबर चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. सर्वज्ञानी जनाब संजय जी राऊत तुम्हाला समीर वानखेडे हा अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी नसून मुसलमान आहे हे सिद्ध करणाऱ्यांची पाठराखण करण्याची का एवढी घाई लागलेली आहे? न्यायालयीन प्रकरणावर अशा गलीच्छ पद्धतीने दबाव आणण्याच्या प्रयत्नांचा मी धिक्कार करते, जय हिंद.. असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

नवाब मलिक यांचा आरोप

आमची लढाई फर्जी समीर वानखेडे यांच्यासोबत आहे. हा हिंदू मुस्लिम प्रश्न नाही. भाजपने असे प्रश्न उपस्थित केले आहेत. मी धर्माला घेऊन कधी राजकारण करत नाही, असे नवाब मलिक म्हणाले. त्याचवेळी ते म्हणाले, दलित मागासवर्गीय असल्याचे खोटे जात प्रमाणपत्र समीर वानखेडे यांनी बनवले. आणि एका मागासवर्गीयाचा हक्क हिरावला. मी समोर आणलेले सर्टिफिकेट खरं आहे. मी माझ्या शब्दावर ठाम आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

अनेक दलित संघटना दलित कार्यकर्ते माझ्यासोबत बोलत आहेत समीर वानखेडेच्या बोगस सर्टिफिकेट बद्दल. अनेक लोक तक्रार करणार आहेत अशी माहितीही नवाब मलिक यांनी दिली आहे.