'चिंतामणी' उत्सव मंडळाने स्वा. सावरकरांना लिहिलेले 'ते' पत्र सापडले

 'चिंचपोकळीचा चिंतामणी' आपल्या शतकमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे.  या उत्सव मुर्तीची किर्ती दिवसेंदिवस सातासमुद्रापार पसरत आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 19, 2017, 07:57 PM IST
'चिंतामणी' उत्सव मंडळाने स्वा. सावरकरांना लिहिलेले 'ते' पत्र सापडले title=

प्रविण दाभोळकर, मुंबई :  'चिंचपोकळीचा चिंतामणी' आपल्या शतकमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे.  या उत्सव मुर्तीची किर्ती दिवसेंदिवस सातासमुद्रापार पसरत आहे.

चिंतामणीच्या आगमन सोहळ्याची, टी-शर्टची खास क्रेझ तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे. या चिंतामणी उत्सव मंडळाने स्वा. विनायक दामोदर सावरकर यांना १९३२ साली लिहिलेले पत्र मंडळाच्या हाती लागले आहे. 24taas.com कडे हे पत्र उपलब्ध झाले आहे.  या पत्राबद्दल साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. 

१९२० साली चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने गणेशोत्सवाला सुरुवात केली. तो काळ स्वातंत्र्याच्या प्रेरणेने भारावलेला होता. इंग्लडच्या गुलामीतून देशाला स्वतंत्र करण्यासाठी स्वातंत्र्यसेनानी झटत होते. भारतामध्ये नव्या क्रांतीचे वारे वाहू लागले होते.

दरम्यान गणेशोत्सवाच्या माध्यमातूनही स्वातंत्र्याच्या जनजागृतीला सुरुवात झाली होती.  स्वा. सावरकरांच्या चिंचपोकळी चिंतामणी उत्सव मंडळातर्फे याच काळात स्वा. विनायक दामोदर सावरकर यांना पत्र लिहिण्यात आले होते.

या पत्राची कॉपी इंग्लंडच्या ऐतिहासिक म्युझिअममध्ये सापडल्याची बातमी मंडळापर्यंत पोहोचली. त्यानंतर हे पत्र कधी हाती लागतय आणि आपण ते कधी पाहतोय याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. 

 'केशवजी नाईक चाळ' उत्सव समितीच्या काही कार्यंकर्त्यांना इंग्लंडच्या या म्युझिअममध्ये हे पत्र दिसले. त्यांनी तात्काळ ज्येष्ठ कॅलिग्राफी कलाकार अच्युत पालव यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचविली. आपल्याअच्युत पालव हे चिंचपोकळी उत्सव मंडळाचेच सदस्य आहेत. त्यामुळे मंडळामध्ये सर्वात आधी त्यांनाच या पत्राबद्दल कळाले. त्यांनी मग उत्सव मंडळाला या संबधीची माहिती दिली. 

१९३२ च्या दरम्यान चिंचपोकळी उत्सव मंडळातर्फे व्याख्यान आयोजित करण्यात येत असत. या व्याख्यानाचे निमंत्रण चिंचपोकळी मंडळातर्फे स्वा. सावरकरांना त्यावेळी देण्यात आले होते.

'हा भाग कामगार वस्तीचा आहे. राजकारण किंवा तुम्हाला आवडेल त्या विषयावर आपण जनतेला संबोधित करावे' असे या पत्रात लिहिलेले दिसून येते. आपली वेळ कळवावी असेही त्यात नमुद केलेले आहे. नुकतीच या पत्राची प्रत मंडळाच्या हाती लागली आहे.

हा ऐतिहासिक ठेवा मंडळातर्फे जतन करुन ठेवण्यात येणार आहे.