'रस्त्यावरून कोळसा वाहतूक करा पण, भारनियमन टाळा'

भारनियमनावरून होत असलेल्या टीकेमुळे सरकार खडबडून जागे झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा मुद्दा गांभीर्याने घेत 'गरज पडली तर रस्ते मार्गाने कोळसा वाहतूक करा, मात्र सर्वसामान्यांना लवकरात लवकर दिलासा द्या', असे म्हटले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 8, 2017, 01:33 PM IST
'रस्त्यावरून कोळसा वाहतूक करा पण, भारनियमन टाळा' title=

मुंबई : भारनियमनावरून होत असलेल्या टीकेमुळे सरकार खडबडून जागे झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा मुद्दा गांभीर्याने घेत 'गरज पडली तर रस्ते मार्गाने कोळसा वाहतूक करा, मात्र सर्वसामान्यांना लवकरात लवकर दिलासा द्या', असे म्हटले आहे.

राज्यातील भारनियमन संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शनिवारी रात्री उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. येत्या सात दिवसांत परिस्थिती नियंत्रणात आणा, अशा सूचना त्यांनी वरिष्ठ अधिका-यांना या बैठकीत दिल्या. या बैठकीला केंद्रीय कोळसा मंत्रालय, कोल इंडिया लिमिटेड, विविध कोळसा कंपन्या, रेल्वे तसंच राज्याचा ऊर्जा विभाग, महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीतील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.  रेल्वेनेही कोळसा वाहतुकीसाठी अतिरिक्त व्यवस्था करण्याचे यावेळी आश्वासन दिलं.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात भारनियमन वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी तसेच, छोटे व्यवसायीक आणि कार्यालयांनाही भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. त्यातच सत्तेतील मित्रपक्ष शिवसेनेही सरकारवर भारनियमनाच्या मुद्दयावरून जोरदार तोंडसुख घेतले आहे. सोशल मीडियावरही सरकारची टिंगल उडवली जात असून, सत्ताधारी भाजपला त्याच भाषेत उत्तर दिले जात आहे.

सत्तेत येण्यापूर्वी भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार जाहीरातबाजी केली होती. या जाहीरातबाजीतून तत्कालीन सरकारला भारनीयमन, महागाई, दरवाढ अशा अनेक मुद्दयांवरून धारेवर धरण्यात आले होते. सोशल मीडियावर नेमका हाच मुद्दा पकडून सरकारवर जोरदार टोलेबाजी सुरू आहे. अनेकांनी तर, मुख्यमंत्र्यांचा सत्तेत येण्यापूर्व्हीचा व्हिडिओ शेअर करून जाब विचारला आहे. या सर्व प्रकारात सरकारची नाचक्की होत आहे. त्यामुळे नेहमीच आपली स्वच्छ प्रतिमा कायम राखणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी ही टीका गांभिर्याने घेतली आहे. म्हणूनच त्यांनी 'गरज पडली तर रस्ते मार्गाने कोळसा वाहतूक करा, मात्र सर्वसामान्यांना लवकरात लवकर दिलासा द्या', असे म्हटल्याचे समजते.