मुंबई: 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकाचा संदर्भ देत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांवर केलेल्या टीकेला छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून खणखणीत प्रत्युत्तर देण्यात आले आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या ट्विटमध्ये संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत त्यांना करड्या शब्दात समज दिली आहे. उद्धवजी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येकवेळी छत्रपती घराण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमावेळी सिंदखेडराजामध्ये काय बोललो आहे ते. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
छत्रपतींच्या वंशजांना शिवरायांची मोदींशी तुलना मान्य आहे का; राऊतांचा सवाल
त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. यासाठी भाजप नेते जय भगवान गोयल यांचे नुकतेच प्रकाशित झालेले 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' हे पुस्तक कारणीभूत ठरले. मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना होऊ शकत नाही, असे सांगत या पुस्तकाच्या शीर्षकावर अनेक शिवप्रेमींना आक्षेप घेतला होता.
या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी थेट छत्रपतींच्या वंशजांना डिवचले होते. मोदींची थेट छत्रपती शिवरायांशी तुलना करणे सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयनराजे, श्रीमंत शिवेंद्रराजे आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का, असा सवाल राऊतांनी विचारला होता.
उद्धव जी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घरण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंती, सिंदखेड राजा मध्ये काय बोललो आहे ते. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही.@OfficeofUT @AUThackeray @ShivSena
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 12, 2020
मात्र, छत्रपती संभाजीराजे यांनी त्यापूर्वीच सिंदखेडराजा येथील सभेत आपली भूमिका स्पष्ट केली होती. नरेंद्र मोदी हे त्यांच्याठिकाणी मोठे नेते आहेत. ते दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांचीच काय इतर कोणाचीही तुलना केली जाऊ शकत नाही, असे संभाजीराजे यांनी म्हटले होते. त्यामुळे कोणतीही माहिती न घेता टीका करणाऱ्या संजय राऊत यांना संभाजीराजे यांनी चांगलेच झापले. आता उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेणार, हे पाहणेदेखील महत्वाचे ठरेल.
ज्या पक्षाच्या कार्यालयात ह्या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी ते पुस्तक तात्काळ मागे घ्यावे. नाहीतर त्याचे वेगळे परिणाम होतील. (2/2)https://t.co/h4oEZvO1oY
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 12, 2020