जामिनानंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, 'झाले मोकळे आकाश'

 सध्या छगन भुजबळ यांच्या स्वादू पिंडाच्या आजारावर उपचार सुरू आहेत, 

Updated: May 10, 2018, 02:35 PM IST

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेत बोलताना भुजबळांनी आपल्याला जामीन मिळाल्यानंतर पहिला फोन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आला असल्याचं सांगितलं, तसेच आपल्याला डॉक्टरांनी आराम करण्याच्या अटीवर डिस्जार्ज दिला असल्याचं सांगितलं आहे, तसेच छगन भुजबळ यांनी शिवेसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे देखील आभार मानले आहेत, शिवसेनेसोबत आपला २५ वर्षाचा ऋणानुबंध असल्याचंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. पंकज भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, पडत्या काळात शिवसेनेकडून दोन शब्द चांगले आपल्या बद्दल चांगले बोलण्यात आले, तसेच उद्धव ठाकरेंच्या शब्दांचा आधार मिळाला. छगन भुजबळ सध्या आपल्या मुंबईतील सांताक्रुझच्या घरी आराम करणार आहेत.

भुजबळ म्हणाले, 'झाले मोकळे आकाश'

बाहेर आल्यानंतर झाले मोकळे आकाश अशा भावना असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटले आहे, मी सव्वा ३ वर्षापासून आजारपणामुळे बेजार होतो, असं देखील भुजबळांनी म्हटलं आहे. तसेच गंमत करताना भुजबळ म्हणाले, डॉक्टरांनी मला सांगितलं आहे, मीडियाशी जास्त बोलू नका. भुजबळांनी जामीन मिळाल्यानंतर पहिली पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांच्या खांद्यावरचं मफलर अनेक दिवसांनी झळकलं.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी छगन भुजबळ मागील सव्वा २ वर्षापासून आर्थर रोड तुरूंगात होते, छगन भुजबळ यांनी आज उद्धव ठाकरे यांचे देखील आभार मानले आहेत. सव्वा दोन वर्षांनी भुजबळ घरी परतले आहेत, सध्या छगन भुजबळ यांच्या स्वादू पिंडाच्या आजारावर उपचार सुरू आहेत, छगन भुजबळ २ दिवसांनी उपचारासाठी पुन्हा लीलावती रूग्णालयात दाखल होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.