मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज आपल्या एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यात आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
शरद पवार आणि चंद्रशेखर राव यांच्यात दीड तास चर्चा झाली. या भेटीत देशातील परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
बैठकीनंतर बोलताना के चंद्रशेखर राव यांनी शरद पवार यांचे आभार मानले. तेलंगना राज्याच्या निर्मितीत शरद पवारांचा पाठिंबा होता, यासाठी राव यांनी त्यांचे आभार मानले. देशातील समविचारी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. देशातील परिवर्तनच्या लढ्यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा, असं वक्तव्य चंद्रशेखर राव यांनी केलं आहे.
शरद पवार अनुभवी नेते आहेत, त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल, सर्वांशी चर्चा करुन एक रणनिती ठरवली जाईल. देशासमोर आज मोठी समस्या आहे, गरीबी, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे विषय असेल यातून मार्ग काढण्यासाठी काय करता येईल यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. समविचारी पक्षाचं एकत्र संमेलन बारामतीत होऊ शकतं, असे संकेतही चंद्रशेखर राव यांनी दिले आहेत.
देशातील समस्यांवर चर्चा झाली
देशासमोर आज अनेक समस्या आहेत. गरीबी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यासह इतर अनेक समस्या आहेत. त्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. राजकीय चर्चा जास्त झाली नाही, विकासावर चर्चा झाली असं शरद पवार यांनी म्हटलं. आम्ही विरोधी पक्षांशी चर्चा करणार आहोत, यानंतर सर्वांचं मत जाणून घेतल्यानंतर एक संयुक्त बैठक घेऊन अजेंडा ठरवू असं शरद पवार यांनी म्हटलं.