Mumbai Local: महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय, लोकलमध्ये उपलब्ध होणार 'ही' सुविधा

Central Railway: उपनगरीय रेल्वे मार्गावर महिला प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ज्याप्रकारे महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ होतेय त्याप्रमाणे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे. हीच गोष्ट लक्षात घेता,मध्य रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

श्वेता चव्हाण | Updated: Apr 24, 2024, 09:28 AM IST
Mumbai Local: महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय, लोकलमध्ये उपलब्ध होणार 'ही' सुविधा title=

Mumbai Local News In Marathi: मुंबई लोकलमधून (Mumbai Local) रोज 75 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. त्यापैकी महिला प्रवाशांची संख्या सुमारे 30 टक्के आहे. तर लोकलमधील 29 टक्के आसने महिला प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. पहाटेच्या पहिल्या लोकलपासून रात्रीच्या शेवटच्या लोकलपर्यंतच्या महिला प्रवासी प्रवास करत असतात. विशेष म्हणजे उपनगरीय रेल्वे मार्गांवर महिला प्रवाशांची संख्या ज्या पटीने वाढत आहे. त्या पटीने महिलांचा लोकल प्रवासाच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आलेला आहे. परिणामी महिला प्रवाशांचा रात्रीचा प्रवास अधित सुरक्षित व्हावा याकरिता लोहमार्ग पोलिस सतत प्रयत्न करत असतात.

याचपार्श्वभूमीवर लोकलमधील महिला डब्यातील छेडछाडीसह इतर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महिलांच्या सर्व डब्यात जून अखेरपर्यंत सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे आता महिलांचा डब्यात आता कडेकोट बंदोबस्त असणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेतील महिला प्रवाशांचा प्रवास आता जूननंतर आधुनिक सुरक्षिततेत असणार आहे. 

रेल्वे पोलीस महासंचालक कार्यालयाने रेल्वेच्या महिला प्रवाशांचे सर्वेक्षण केले. खाकी गणवेशात रेल्वे पोलिस तैनात करण्याची पारंपरिक पद्धत बदलून सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा लागू करून आधुनिक सुरक्षेची गरज असल्याचे मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सुमारे 59 टक्के महिला प्रवाशांनी व्यक्त केले. म्हणूनच लोकल ट्रेनमध्ये महिलांवरील विनयभंग आणि इतर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, रेल्वे बोर्डाने मध्य आणि पश्चिम रेल्वेला सर्व महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

594 महिला डब्यात टॉकबॅक यंत्रणा

आपत्कालीन परिस्थितीत महिलांना तात्काळ मदत मिळावी यासाठी लोकलच्या गार्डशी संवाद साधता यावा, या उद्देशाने टॉकबॅक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. लोकलमध्ये 594 महिला डब्यात टॉकबॅक (talk back system) प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. 30 जूनअखेर सर्व महिला डब्यांत टॉकबॅक यंत्रणा सुरु होणार. यंत्रणेतील बटण दाबल्यानंतर गार्डशी संवाद साधून योग्य ती मदत महिला प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. यामुळे संकटकाळात महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. 

कशी असेल यंत्रणा

मध्य रेल्वेच्या प्रशासकीय संचालकांनी सांगितले की, मुंबई आणि उपनगरातील 117 रेल्वे स्थानकांवर पॅनिक बटण यंत्रणा बसवण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्मच्या दोन्ही दिशांना एक-एक अशी दोन पॅनिक बटणे असतील.विशेषत: महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांच्या डब्यासमोरच पॅनिक बटण बसवण्यात येणार आहे. संकटाच्या वेळी पुरुष आणि महिला प्रवाशांना पॅनिक बटण वापरण्यास परवानगी दिली आहे. पॅनिक बटण दाबताच अलार्म वाजेल. यासोबतच लाल दिवा पेटाच रेल्वे सुरक्षा दल(RPF) नियंत्रण कक्ष सतर्क राहणार आहे. प्लॅटफॉर्मवर आधारित सीसीटीव्ही यंत्रणेमुळे संकटात सापडलेल्या प्रवाशाला सहज टिपू शकेल आणि तातडीने मदत मिळेल.