झालं गेलं विसरुन जा, अजितदादांना राष्ट्रवादीत परत आणा- छगन भुजबळ

आज मला माझे अनेक जुने मित्र ( शिवसैनिक) भेटले.

Updated: Nov 26, 2019, 08:52 PM IST
झालं गेलं विसरुन जा, अजितदादांना राष्ट्रवादीत परत आणा- छगन भुजबळ title=

मुंबई: झालं गेलं विसरुन जाऊन अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत आणा, अशी मागणी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले. ते मंगळवारी मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी छगन भुजबळ यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. आज मला माझे अनेक जुने मित्र ( शिवसैनिक) भेटले. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यानंतर छगन भुजबळ यांनी अजित पवार यांचाही उल्लेख केला. जे काही झालंय ते पोटात घालू. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी शरद पवार यांनी परवानगी द्यावी, अशी विनंती यावेळी भुजबळ यांनी केली. 

अबकी बार 'ठाकरे सरकार'; महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंची निवड

अजित पवार हे शनिवारी राष्ट्रवादीला धक्का देत भाजपच्या गोटात दाखल झाले होते. त्यांनी आमदारांचा एक गट फोडत फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते आणि पवार कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी अजित पवार यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. अखेर आज या प्रयत्नांना यश आले आणि अजित पवार यांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने भाजपचे पुन्हा सत्तेत राहण्याचे स्वप्न धुळीला मिळाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही नाईलाजाने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

'आता मोठ्या भावाला भेटायला दिल्लीला जाणार'