दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानाचे पाणी बिल थकल्याची माहिती समोर आल्यानंतर मंगळवारी विधानसभेत त्याचे पडसाद उमटले. माहिती अधिकारातंर्गत समोर आलेल्या या माहितीनुसार 'वर्षा' या निवासस्थानाचे तब्बल ७ लाख ४४ हजार ९८१ रुपयांचे पाणी बिल थकले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ यासंदर्भात खुलासा करताना अशी कोणतीही थकबाकी नसल्याचे स्पष्ट केले होते.
मात्र, या मुद्द्यावरून अजित पवार यांनी सरकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मुंबईत कोट्यवधी लोक राहतात. एखाद्याने पाणीपट्टी भरली नाही तर पाण्याचे कनेक्शन तोडले जाते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचे पाणी बिल थकीत असूनही कोणतीही कारवाई केली जात नाही. अशावेळी शासकीय अधिकारी काय झोपा काढत होते का? प्रशासनाने वर्षा बंगल्याचा पाणीपुरवठा तात्काळ तोडला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना बिना आंघोळीचे सभागृहात येऊ द्या, असे अजित पवार यांनी म्हटले.
.... म्हणून मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा' बंगला डिफॉल्टर यादीत
अजित पवारांच्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, हल्ली माहिती अधिकारातंर्गत ठराविक काळासाठीची माहिती मागवली जाते. ही माहिती प्रसारमाध्यमांना देऊन बातम्या चालवल्या जातात. मात्र, नंतर याबाबतचा खुलासा केल्यानंतर या बातम्या थांबवल्याही जातात. यावेळी असाच प्रकार घडला आहे. वर्षा बंगल्याचे कोणतेही बिल थकीत नाही. उलट जे बिल भरले होते तेच प्रशासनाकडून पुन्हा पाठवण्यात आले. त्यामुळे याबाबतचे सोपस्कार पार पडायला वेळ गेला. कोणतीही थकबाकी नसल्याने पाणी तोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मी सभागृहात रोज आंघोळ करूनच येणार, असा टोला मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना लगावला.