Bomb Threat On Mumbai Local Train: मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला लोकल ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा फोन करणाऱ्या आरोपीला जुहू पोलिसांनी अटक केली आहे.. रविवारी सकाळी मुंबईतील पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन लोकल ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला होता. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याचं फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं होतं. कालच (5 ऑगस्ट 2023) मुंबई पोलिसांना विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली होती. आज मुंबई लोकलसंदर्भातील धमकी आल्यानंतर रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आणि पोलिसांनी फोन करणाऱ्याचा तपास सुरु केला.
शनिवारी मुंबई विमानतळ उडवून देण्यासंदर्भात आलेल्या धमकी प्रकरणात सहारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील बातम्या समोर आल्या असतानाच आज पुन्हा मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रेल्वेमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा फोन आला. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला आलेला हा फोन महिला पोलीस अधिकाऱ्याने रिसिव्ह केला. या महिला पोलीस अधिकाऱ्याने फोन करणाऱ्या व्यक्तीकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र फोन करणाऱ्या व्यक्तीने हा फोन कट केला, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. आता हा फोन नेमका कुठून आला होता यासंदर्भातील ट्रेसिंग करण्याचं काम पोलिसांनी सुरु केलं. पोलिसांना अवघ्या काही तासांमध्ये यश आलं. हा फोन बिहारमध्ये राहणाऱ्या अशोक शंकर मुखीया या तरुणाने केला होता. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे या तरुणाला अटक केली आहे.
मुंबई पोलिसांना पहाटे आलेल्या या फोनवर आरोपी अशोक शंकर मुखीयाने आपण विलेपार्लेमधून बोलत असल्याचं सांगितलं होतं. ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती त्याने दिली. पोलिसांनी नेमक्या कोणत्या ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे याबद्दलची माहिती विचारली असता अशोक शंकर मुखीयाने फोन कट केला होता. आता अशोक शंकर मुखीयाने असा फोन का केला होता? हा फोन करण्यामागील मूळ उद्देश काय होता यासंदर्भातील तपास जुहू पोलीस करत आहेत.
राज्य दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यातून दहशतवादी कट रचल्याच्या गुन्ह्याखाली अटक केलेल्या तरुणांकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा भागात दहशतवाद्यांना बाँम्ब तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आल्याचा प्रकार या तरुणांच्या चौकशीदरम्यान उघडकीस आला आहे. बॉम्ब बनवण्यासाठीचं साहित्यही आढळून आल्याचं सांगण्यात आलं आहे. एटीएसने मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतलेल्या झुल्फिकार अली बडोदावाला याने महंमद युनूस महंमद याकू साकी आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान यांना पुण्यात आणल्याचे तपासात उघडकीस आले आहे. जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) साकी आणि खान यांचा शोध घेत असताना बडोदावाला याने त्यांना पुण्यात आणून त्यांच्या मार्फत बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.