अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : विजय यात्राच्या माध्यमातून भाजप राज्यात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. येत्या २ ऑगस्टपासून पुढील सुमारे २५ दिवस भाजप राज्यातील सर्व जिल्ह्यातून विजय यात्रा काढणार आहे. या विजय यात्रेमध्ये आतापर्यंत केलेली विकास कामे, घेतलेले निर्णय या यात्रेच्या मध्यामातून लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न भाजपतर्फे केला जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे सर्व मंत्री, पदाधिकारी या यात्रेला पूर्ण वेळ देणार आहे. जिल्ह्यातील मुख्य मार्गातून यात्रा आणि जिल्ह्याच्या मुख्य शहरात सभा असं या कार्यक्रमाचे सर्वसाधारण स्वरुप असणार आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याआधी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या प्रचाराला तयार करण्यासाठी, राज्यात पक्षाबद्दल सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी या विजय यात्रेचे आयोजन केलं जाणार आहे.
सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेची युती झाली असल्यामुळे मतांचं विभाजन होणार नाही आहे. 'फिर एक बार, शिवशाही सरकार' आणि 'अब की बार, २२० के पार' अशी घोषणा देत भाजप मैदानात उतरणार आहे.