मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पत्नीसमवेत एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. याच व्हिडिओचे पडसाद आज विधिमंडळातही पाहायला मिळाले.
वृत्तसंस्था 'पीटीआय'नं दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी याच मुद्द्यावर भाजप सरकारवर टीका केलीय. 'हे मंत्री आहेत की बॅन्डमध्ये काम करणारी लोकं, याचं मला आश्चर्य वाटतंय. नदी संरक्षणावर वायरल झालेला एक व्हिडिओ मी पाहिला. आपल्या मुख्यमंत्र्यांना त्या व्हिडिओत पाहून मला आनंदच झाला. आता, भारतीय जनता पार्टीनं आता आपलं नाव बदलून 'बेन्जो पार्टी' करा' असं म्हणता विखे पाटील यांनी भाजपवर आणि मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला.
'या व्हिडिओत भाजप आणि शिवसेनेचं मित्रप्रेम मात्र दिसलं नाही, हे पाहून थोडी खंत वाटली', असंही विखे पाटील यांनी म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे, यावेळी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर नव्हते. त्यामुळे भाजप आमदार संजय कुटे यांनी पाटलांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत 'मुख्यमंत्री हे सामाजिक कार्य म्हणून करत आहेत... त्यात टर उडवण्यासारखं काही नाही' असं म्हणत भाजपची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्र्यांच्या या व्हिडिओत नदी संरक्षणाचा संदेश देण्यात आलाय. 'मुंबईतील नदी शुद्धीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करणारी ध्वनिचित्रफीत ही शासनाने किंवा शासनाच्या कोणत्याही विभागाने तयार केलेली नाही. नदी शुद्धीकरण क्षेत्रात काम करणाऱ्या रिव्हर मार्च या अशासकीय संस्थेने ती तयार केली आहे. शासनातर्फे या व्हीडिओवर कोणताही निधी खर्च झालेला नाही आणि त्याचा कुठल्याही विभागाशी संबंध नाही' असं स्पष्टीकरणही मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीनं देण्यात आलंय.