मुंबई : राज्यात आरोग्य विभागाच्या परिक्षेत झालेल्या गोंधळाबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पाचव्यांदा आरोग्य विभागाच्या परिक्षेत गोंधळ झाला आहे. पेपरफुटीनं राज्याचा कारभार चव्हाट्यावर आला आहे, अशी टीका करत चित्रा वाघ यांनी यासंदर्भात राज्याचे पर्यावण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे.
या पत्रात चित्रा वाघ यांनी चार प्रश्न विचारले असून सरकारच्या भोंगळ कारभाराने विद्यार्थ्यांचं स्वप्न धुळीस मिळालं आहे, राज्यातील विद्यार्थ्यांचा आक्रोश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्याकडे पाठवा, कारण ते तुमच्याशिवाय कोणाचं ऐकत नाहीत, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तरी डरकाळी फोडावी, असं आवानही चित्रा वाघ यांनी केलं आहे.
चित्रा वाघ यांनी पत्रात काय म्हटलं आहे
मा. आदित्य ठाकरेजी
खरंतर तुम्हाला पत्र लिहून विद्यार्थ्यांची व्यथा मांडण्याची गरज नव्हती. पंरतु तुमच्या वडिलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच ही वेळ आणली आहे. त्यांना तुमच्या शिवाय कोणाची चिंता नाही. तुमच्याशिवाय कोणाचं ऐकत नाहीत म्हणून तुमच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना विनंती करते आहे. वास्तविक मुलाच्या भवित्यव्यासाठी वडील किती कष्ट घेतात हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे. तुमचे वडील स्वप्न पूर्ण करण्याासाठी राज्याचे मुख्यमंत्री झाले. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आल्यावर मात्र ते गप्प बसलेत. तेही जेव्हा विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळत आहे.
मागील काही दिवसांपासून मी सातत्याने आरोगय विभागाच्या परीक्षेतील गोंधळ त्यांच्या निदर्शनास आणून दिला. परंतु त्यांच्या्कडून कोणताही प्रतिसाद मिळाली नाही. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राज्यातील जनतेचे असंख्य विद्यार्थ्यांचे पालक आहेत. हा विसर त्यांना कसा काय पडू शकतो. आज पाचव्यांदा आरोग्य विभागाचा पेपर फुटला आहे. यावर माझे काही प्रश्न आहेत.
१ - न्यासा एजन्सीची चौकशी का लावली नाही?
२ - एजन्सीला ब्लॅक लिस्टमध्ये का टाकलं नाही?
३ - एजन्सीला परीक्षेचा अनुभव नसताना कंत्राट का दिले गेले?
४ - MPSC सारखी विश्वासार्ह संस्था असताना न्यासा एजन्सीच का निवडली?
या प्रश्नांची उत्तरं सरकारने द्यावी. खरंतर ४ वेळा ठेच लागूनही पुन्हा पाचव्यांदा परीक्षा घेण्याची जबाबदारी त्याच एजन्सीकडे कशी काय दिली जाऊ शकते? यात तिन्ही पक्षात काही साटंलों झालंय का असा याचा संशय येतो. आपण राज्यभरातील विद्यार्थ्यांचा आक्रोश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवाल आणि वाघ डरकाळी फोडू शकतो हे दाखवून द्याल असं आवाहन चित्रा वाघ यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांना केलं आहे.