'शिवसेना एक विचार, तो संपवण्याचा भाजपाचा डाव' उद्धव ठाकरे यांचा आरोप

'एकनाथ शिंदेंना भाजपसोबत जायचंय' बंडाआधी झालेल्या चर्चेचा उद्धव ठाकरेंनी केला गौप्यस्फोट

Updated: Jun 24, 2022, 11:18 PM IST
'शिवसेना एक विचार, तो संपवण्याचा भाजपाचा डाव' उद्धव ठाकरे यांचा आरोप title=

CM Uddhav Thackeray Live : महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी राज्यातील सर्व नगरसेवक आणि शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदार आणि भाजपवर घणाघात केला. बंडखोरी करुन गेलेल्यांना भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. भाजपाला तेच हवंय, एकाबाजूला शिवसेना संपवायची आणि भाजपाची वाढ करायची, हे यांचं हिंदुत्व आहे त्यांचा उद्देश आहे, शिवसेना एक विचार आहे आहे तो संपवणयाचा भाजपाचा डाव आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

बंडखोर आमदारांकडून काही मेसेज पसरवले आहेत की आम्हाला उद्धव ठाकरे यांनीच हे करायला सांगितलं आहे, त्यामुळे तुम्हीही आमच्यासोबत या. म्हणजे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करायचा, पण मी शिवसेनेशी कधीही गद्दारी करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.

शिवसेनेच्या बंडामागे आपण स्वतःच असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज धुडकावून लावला. भाजप हा विश्वासघातकी पक्ष आहे, भाजपला हिंदुत्वामध्ये दुसरा खातेदार नकोय, त्यामुळं ते शिवसेना संपवायला निघालेत, अशी घणाघाती टीका त्यांनी नगरसेवकांच्या बैठकीत बोलताना केली. बंडाआधी एकनाथ शिंदेंसोबत नेमकी काय चर्चा झाली, याचा गौप्यस्फोटही ठाकरेंनी यावेळी केला.

एकदा म्हणायचं मुख्यमंत्री आम्हाला भेटत नाही, एकदा म्हणायचं राष्ट्रवादी आम्हाला निधी देत नाहीत, काँग्रेस आम्हाला मदत करत नाही. एकनाथ शिंदे यांना मी सांगितलं होतं, मी तुम्हाला जबाबदारी दिली आहे, शिवसेनेची, शिवसैनिकांची, शिवसेना आमदारांची, खासदारांची, जिल्हा प्रमुख आणि महापालिकेची कामं करण्याची. आता ते सांगतायत की राष्ट्रवादी त्रास देत आहेत, मग मला तोंडावर सांगा, मी सांगतो त्यांना, एक घाव दोन तुकडे करायचे असतील तर तेही करुया. 

त्यावर ते म्हणतात आमदारांचा माझ्यावर दबाव आहे की भाजपसोबत जायचा, असे कोण आमदार ते घेऊन या माझ्यासमोर बघू आपण. सर्व शिवसैनिक आणि त्यांची इच्छा असेल तर तेही करुया. पण जो भाजप विश्वासघातकीपणाने आपल्यासोबत वागला आहे, 2014 साली युती तोडली, 2019 साली आपल्याविरोधात बंडखोर उभे केले. आपल्याला दिलेली वचणं त्यांनी नाकारली. त्याच भाजपासोबत जाण्याचं शिवसैनिकांचं मत असेल तर भाजपकजून व्यवस्थित प्रपोजल आलं पाहिजे, आपल्या शिवसैनिकांना मान्य पाहिजे, आपल्या लोकांच्यामागे केवळ द्वेषापोटी चौकशींचा ससेमिरा लावला आहे, का लावला आहे असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

मातोश्रीची बदनामी, कुटुंबियांची बदनामी, माझी बदनामी केली जात आहे. मातोश्री हे सर्व शिवसैनिकांचं श्रद्धास्थान आहे त्यावर वेडवाकडं बोललं जातं त्यांच्याबरोबर परत जायचं असेल तर मी एकटा त्यात जाणार नाही. तुम्हाला जायचं असेल तर जरुर जा पण त्या आमदारांनी माझ्याकडे येऊ द्या माझ्याशी बोलू द्या, मग त्यानंतर आपण भाजपसोबत जायचं की नाही जायचं हे ठरवू, आमदार माझ्याकडे आले असते आणि बोलले असते तर इथल्या इथे मार्ग निघाला असता. पण तसं न करता सूरतला आणि गुवाहाटीला गेले. 

मला मुख्यमंत्री पदाचा मोह तेव्हाही नव्हता आणि आताही नाही,  शिवसेनाप्रमुखांनी शेवटच्या भाषणात सांगितलं होतं, उद्धवला जपा, आदित्यला जपा त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला जपत आला आहात. याचा अर्थ असा नाही की केवळ साहेबांनी सांगितलं म्हणून मी तुमच्याशी वेडावाकडा वागेन. 

जर पक्ष चालवण्यासाठी मी व्यवस्थित वाटत नसेन तर निर्णय तुमचा आहे की उद्धवजी केवळ साहेबांनी सांगितलं म्हणून तुम्हाला नेता म्हणून मानलं आता दूर व्हा, मी लगेच राजीनामा देतो.  शिवसेना ही कुटुंबाची खाजगी मालमत्ता नाही तर शिवसेना हा विचार आहे. तो विचार आज भाजप संपवायला निघाली आहे.  हा त्यांचा डाव निट लक्षात घ्या, त्यांना हिंदुत्वाच्या व्होट बँकमध्ये दुसरा कोणी नको आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

जो शिवसैनिक माझ्यासोबत राहिल त्याच्या सोबतीने मी पुन्हा शिवसेना उभी करेन असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, "शेराला सव्वाशेर मिळतोच. शिवसेना ही तळपणारी तलवार आहे, ती म्यानात घातली तर गंजते, आणि बाहेर काढलं तर तळपते. तीच आता वेळ आली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.