Maha Vikas Aghadi Maha Morcha : शिंदे - फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने केला जाणारा महापुरुषांचा अपमान या मुद्यांवरुन मुंबईत महामोर्चा (Maha Morcha) काढण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीतील नेत उपस्थित होते. या मोर्चासाठी तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 1 लाखांपेक्षा जास्त लोक या मोर्चात सहभागी होणार असल्याचे महाविकास आघाडीतर्फे सांगण्यात आले होते. मात्र आता भाजपने मोर्चाला जमलेल्या गर्दीवरुन महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
भाजप महाराष्ट्र या ट्विटर हॅंडलवरुन एक फोटो ट्विट करत भाजपने या महामोर्चाची खिल्ली उडवली आहे. "मविआ नेत्यांचा सुकाळ, कार्यकर्त्यांचा दुष्काळ! हे तीन पक्षाचे कार्यकर्ते आहेत... यापेक्षा जास्त तर एका लग्नातील वऱ्हाड असते," अशी टीका भाजपने केली आहे.
मविआ नेत्यांचा सुकाळ, कार्यकर्त्यांचा दुष्काळ!
हे तीन पक्षाचे कार्यकर्ते आहेत...
यापेक्षा जास्त तर एका लग्नातील वऱ्हाड असते! pic.twitter.com/9gc5X1SsZM— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 17, 2022
राज्यपालांना शरम वाटली पाहिजे - शरद पवार
दरम्यान, या मोर्चावेळी भाषण करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांसाह सरकारवर जोरदार टीका केली. राज्यकर्त्यांनी या इशाऱ्यातून बोध घेतला नाहीतर लोकशाहीच्या माध्यमातून धडा शिकवायल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असा राज्यपाल कधी पाहिला नाही. राज्यपालांना शरम वाटली पाहिजे. सगळ्या देशभरात महात्मा फुले यांचे नाव आदराने घेतलं जातं. अशा व्यक्तीची टिंगलटवाळी राज्यपालांकडून केली जात असेल तर त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांची हकालपट्टी करावी," असे शरद पवार यांनी म्हटले आहे.