मुंबई : कुलाबा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचे कार्यकर्ते आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार भाई जगताप यांच्या कार्यकर्त्यांत वाद झाला. प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर आले. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्याचं रुपांतर धक्काबुक्कीत झाले. दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर आरोप केलेत. राहुल नार्वेकरांनी आरोप धुडकावून लावत भाई जगताप यांच्यावर गुंडगिरीचा आरोप केला आहे. एलटी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, भाजप - शिवसेना युतीत वाद उफळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बंडखोरी रोखण्यात दोन्ही पक्ष नेत्यांना अपयश आले आहे. काही ठिकाणी बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तरी काही ठिकाणी मोठी डोकेदुखी कायम आहे. कल्याण पश्चिमेचे बंडखोर भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी आज भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आपल्या भूमिकेमुळे पक्षाला त्रास होऊ नये यासाठी राजीनामा दिल्याची पवार यांची भूमिका आहे. नरेंद्र पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर ही माहिती दिली आहे. मात्र, माझ्यावर अन्याय झाल्याने मी हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझं काय चुकले आणि उमेदवारी नाकारली, असा सवालही उपस्थित केला आहे.