मुंबई : विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. तसेच एक्झिट पोलने अंदाजही वर्तविला आहे. पुन्हा युतीची सत्ता येणार असे भाकित केले आहे. मात्र, अनेक राजकीय पक्षांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निकाल येऊ द्या, मगच बोलू असे म्हटले आहे. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेशिवाय भाजप सत्ता स्थापन करु शकत नाही. शिवसेना १०० जागांवर जिंकेल, असा दावा केला आहे. त्याचवेळी सेनेशिवाय भाजप राज्य करु शकत नाही, असे म्हटले आहे.
शिवसेना - भाजप युतीची पुन्हा राज्यात सत्ता येईल. युतीला २००च्या पुढे जागा मिळतील हे कोणीही ज्योतिष्याने किंवा एक्झिट पोलने सांगण्याची गरज नाही. तसेच भाजपला शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय नाही. शिवसेना - भाजप एकमेकांशिवाय पर्याय नाही. राज्यात युतीचेच सराकर येणार आहे, असा दावा राऊत यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा प्रचार स्थानिक प्रश्नांऐवजी पाकिस्तान आणि कलम ३७० पुरता मर्यादित राहिल्याने राज्यातील मतदानाची टक्केवारी घसरली, असा टोला त्यांनी भाजपला हाणला. यावेळी त्यांनी राज्यातील मतदानाची टक्केवारी घसरण्याला राजकीय पक्षांचा प्रचार कारणीभूत असल्याचे म्हटले.