Vidhan Parishad Election 2021 : भाजपकडून उमेदवार जाहीर, मुंबईतून उत्तर भारतीय नेत्याला संधी

10 डिसेंबरला विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे

Updated: Nov 19, 2021, 10:03 PM IST
Vidhan Parishad Election 2021 : भाजपकडून उमेदवार जाहीर, मुंबईतून उत्तर भारतीय नेत्याला संधी title=

मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 10 डिसेंबरला विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी भाजपने आज उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. 

मुंबईतून उत्तर भारतीय नेता
मुंबईतून भाजपने उत्तर भारतीय नेत्याला संधी देण्यात दिली आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेले राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय मतदारांवर डोळा ठेऊन राजहंस सिंह यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठे नेते गुरुदास काम गटातील राजहंस सिंह गेली तब्बल 40 वर्ष काँग्रेसमध्ये कार्यरत होते. पण संजय निरुपम यांच्या कारभाराला कंटाळून त्यानी भाजपमध्ये प्रवेश केला.

दिंडोशी विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून राजहंस सिंह यांनी आधी काम केलं आहे. शिवसेनेचे सुनील प्रभू यांच्या मतदार संघात आणि पश्चिम उपनगरात उत्तर भारतीय चेहरा म्हणून सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

नागपूरमध्ये बावनकुळेंना संधी
नागपूरमधून गिरीष व्यास यांच्याऐवजी चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत बावनकुळे यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्याची भरपाई म्हणून विधान परिषदेची उमेदवारी देऊन केल्याचं बोललं जात आहे. बावनकुळे यांना उमेदवारी देत ओबीसी मतदार असलेल्या विदर्भात पुन्हा जनाधार वाढवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. 

धुळे-नंदूरबारमधून अमरीश पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमरिश पटेल यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. गेली अनेक वर्ष ते धुळ्यातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत जिंकून येत आहेत. 

अकोल-बुलडाण्यातून वसंत खंडेलवाल यांना तर कोल्हापूरमधून अमल महाडिक यांना संधी देण्यात आली आहे. 

कर्नाटक विधान परिषदेत कोडागू या जागेसाठी सुजा कुशलप्पा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.