'भाटिया'त १४ तर 'जसलोक'मधील आणखी ११ कर्मचाऱ्यांना कोरोना

मुंबईत कोरोना रुग्णांची एकूण संख्या १३९९वर पोहचली आहे.

Updated: Apr 12, 2020, 09:07 PM IST
 'भाटिया'त १४ तर 'जसलोक'मधील आणखी ११ कर्मचाऱ्यांना कोरोना title=
संग्रहित फोटो

मुंबई : मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतो आहे. रुग्णांनंतर आता डॉक्टर आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. ताडदेव येथील भाटिया रुग्णालयातील १४ कर्मचाऱ्यांना आणि जसलोक रुग्णालयातील आणखी ११ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

भाटिया रुग्णालय यापूर्वीच तीन रुग्णांना कोरोना झाल्यानंतर बंद करण्यात आलं होतं. रुग्णालयातील संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केलं आहे.

दुसरीकडे, जसलोक रुग्णालयातील आता एकूण ३० हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. जसलोक रुग्णालयातील ११ जणांचे रिपोर्ट ४ दिवसांपूर्वीच पॉझिटिव्ह आले असून पालिकेच्या संसर्गजन्य रोग विभागाकडे याची रविवारी नोंद झाली आहे. तसंच जसलोक रुग्णालयातील इतर १०८० कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

दादरमधील सुश्रृषा रुग्णालयातही २ डॉक्टर आणि ४ नर्सला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज तब्बल २१७ नवे रुग्ण वाढले आहेत. गेल्या २४ तासांत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची एकूण संख्या १३९९वर पोहचली आहे. तर मुंबईत आतापर्यंत ९१ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत अतिगंभीर म्हणजेच कोरोना हॉटस्पाट असलेल्या विभागांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईत ७ हॉटस्पॉट भाग आहेत. मुंबईत ज्या ठिकाणी कोरोनाचे जास्त रुग्ण आढळले आहेत त्या विभागांना पालिकेने रेड झोन घोषित केलं आहे. आतापर्यंत जी/दक्षिण (वरळी-प्रभादेवी), ई (भायखळा), डी (ग्रँट रोड), के/दक्षिण (अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम) आणि एच/पूर्व (वांद्रे पूर्व), कुर्ला (एल वॉर्ड) आणि मानखुर्द-गोवंडी-देवनार (एम/ई) या विभागांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.