भांडूप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, शिवसेनेला दे धक्का

मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ११६ च्या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवलाय. तर शिवसेना आमदारांच्या पत्नीला पराभव पत्करावा लागल्याने सेनेसाठी हा पराभव चिंतेचा आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 12, 2017, 01:10 PM IST
भांडूप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, शिवसेनेला दे धक्का title=

मुंबई : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ११६ च्या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवलाय. तर शिवसेना आमदारांच्या पत्नीला पराभव पत्करावा लागल्याने सेनेसाठी हा पराभव चिंतेचा आहे. दरम्यान, या विजयामुळे पालिकेत भाजपने संख्याबळाचा ८३ चा आकडा गाठलाय. तर शिवसेनेचा ८४ आहे.

पोटनिवडणुकीसाठीही भाजपकड़े आपला उमेदवार नव्हता. कॉंग्रेसच्या दिवंगत नगरसेविकेच्या मुलाला आणि सून जागृती पाटील यांना पक्षात घ्यावे लागले. भाजपने 
सूनेला तिकिट देवून सहानभूतीच्या लाटेचा फायदा उचललाय.

परंतु भांडूप पोटनिवडणुकीतील पराभवाने सेनेलाही आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. एका आमदार पत्नी मीनाक्षी पाटील यांचा प्रचंड मताधिक्क्यानं पराभव होत असेल तर नक्कीच चिंता वाढवणारी गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

बुधवारी या निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडलं. मतदानाला इथल्या मतदारांचा थंड प्रतिसाद लाभला. काँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. 

शिवसेनेतून आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपातून प्रमिला पाटील यांच्या सून जागृती पाटील निवडणुकीच्या रिंगणात होत्या. प्रचाराच्या काळात दोन्ही पक्षाचे बडे नेते या मतदारसंघात तळ ठोकून होते. 

यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामाऱ्याही झाल्या. त्याच पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदानानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपल्याच उमेदवाराच्या विजयाचा दावा केला होता. मात्र, यात भाजपने बाजी मारली.