बॅलेट पेपर इतिहासजमा, आता ईव्हीएमवरच निवडणूक - सुनील अरोरा

 आगामी विधानसभा निवडणुका या बॅलेट पेपरवर होणार नाहीत.

ANI | Updated: Sep 19, 2019, 09:29 AM IST
बॅलेट पेपर इतिहासजमा, आता ईव्हीएमवरच निवडणूक - सुनील अरोरा title=
Pic Courtesy: ANI

मुंबई : निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुका या बॅलेट पेपरवर न होता ईव्हीएमवरच होतील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बॅलेटपेपरची मागणी करणाऱ्या राजकीय पक्षांना मोठा झटका बसला आहे. विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, अशी मागणी महाराष्ट्रातल्या काही राजकीय पक्षांनी केली होती. मात्र बॅलेटपेपर इतिहासजमा झाले आहे. आता ईव्हीएमवरच निवडणूक घेण्यात येईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

दरम्यान, ईव्हीएम मशिनचे समर्थन करताना ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो, मात्र त्या मशिनसोबत छेडछाड होणे शक्य नाही, असेही अरोरा यांनी म्हटले आहे. काही पक्षांनी निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे की दिवाळीनंतर निवडणूक घ्या, याबाबत विचार केला जाईल असे सांगताना सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी आलेल्या पुराचाही उल्लेख त्यांनी केला.

विधानसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच घोषित केल्या जातील, असे सांगून त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्ट केले जाईल असे यावेळी म्हटले.  त्यामुळे निवडणुका कधी जाहीर होणार, याबाबतची उत्सुकता कायम आहे. दिवाळीचा सण, शाळांच्या सुट्टय़ा, परीक्षा तसेच एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पोलीस दल स्थलांतरित करणे, या सर्व गोष्टीचा विचार करून निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. 

राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा मुबंईत आले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत आयुक्त अशोक लवासा, सुशीलचंद्र आणि निवडणूक आयोगाचे अन्य वरिष्ठ अधिकारी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दोन दिवस मुंबईत आहेत.