Atal Setu: मुंबईतील नव्या सी-लिंकवर Speed Limit किती? जाणून घ्या

Atal Setu: अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा अर्थात इंटिलिजेंट ट्राफिक मॅनेजमेन्ट सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत सागरी सेतूवर विविध प्रकारचे तब्बल 400 कॅमेरे बसवण्यात आले आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jan 11, 2024, 08:33 AM IST
Atal Setu: मुंबईतील नव्या सी-लिंकवर Speed Limit किती? जाणून घ्या title=

Atal Setu: शुक्रवारी मुंबई आणि नवी मुंबईकरांना अजून एक मोठं गिफ्ट मिळणार आहे. देशातील सर्वात जास्त २२ किलोमीटर लांबीचा समुद्री मार्गावरील 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू' (मुंबई पारबंदर प्रकल्प) अर्थात एमटीएचएलचे उद्या म्हणजेच 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद‌्घाटन होणार आहे. दरम्यान सागरी सेतूवरून गाडी चालकांना ताशी 100 किमी वेगाने वाहने चालवता येणार असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) स्पष्ट करण्यात आलंय.

अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक यंत्रणा तैनात

अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा अर्थात इंटिलिजेंट ट्राफिक मॅनेजमेन्ट सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत सागरी सेतूवर विविध प्रकारचे तब्बल 400 कॅमेरे बसवण्यात आले आहे. त्यामुळे स्पीडचं उल्लंघन करणाऱ्या गाड्या या कॅमेऱ्यात काही सेकंदात कैद होणार आहेत. अशा वाहन चालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्धाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना या प्रकपाच्या बांधकामास सुरुवात झाली होती. त्यामुळे दोन्ही नेत्यांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी मानला जातोय. या प्रकल्पाचे उद्घाटन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तब्बल 18 हजार कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेला हा प्रकल्प मुंबईसह, नवी मुंबई, रायगड आणि इतर शहरांमधील अंतर केवळ 20 मिनिटांवर आणणार आहे. 

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर सर्वसामान्यांसाठी हा सागरी सेतू शनिवारपासून खुला होण्याची शक्यता आहे. या महामार्गाची रचना ताशी 100 किमी वेगमर्यादेनुसार करण्यात आली आहे. पूर्वी महामार्गावरून ताशी 80 किमी वेगमर्यादा ठेवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला होता. मात्र आता सागरी सेतू वाहतुकीसाठी खुला होत असताना एमएमआरडीएने ताशी 100 किमी अशी वेगमर्यादा ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.

एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार या सागरी सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणेअंतर्गत 21.80 किमीदरम्यान सुमारे 400 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून यात 130 हाय डेफिनिशन पीटीझेड कॅमेरे, 190 आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित थर्मल कॅमेरे, 36 अंडर ब्रिज कॅमेरे, 12 सेक्शन स्पीड आणि 22 स्पॉट स्पीड कॅमेरे यांचा समावेश आहे. इतक्या अत्याधुनिक सुविधांमुळे अटल सेतूवरील प्रवास सुरक्षित होणार असल्याचंही एमएमआरडीएचं म्हणणं आहे.