Assembly Election Result: 4 राज्यांचे निकाल हाती आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा, देशासाठी केलेलं काम, अमित शाह यांचे नियोजन यशस्वी झालंय. आतापर्यंत लोक घरघर मोदी म्हणत होते आता मनमन मै मोदी म्हणतील, असा निकाल आपण पाहिला. मोदींचा करिश्मा संपला असे अनेकजण म्हणत होते. खूप बदनामी यात करण्यात आली. हे निकाल जनतेच्या हातात असतात. या जनतेने निवडणुकांमध्ये मोदींना साथ दिली. देशाचे कतृत्व मोठ्या उंचीवर नेण्याचे काम मोदींनी केले. त्यामुळे 3 राज्यांमध्ये मोठ्या फरकाने भाजप आणि एनडीएला विजय मिळाला.
राहुल गांधी परदेशात जाऊन मोदींची बदनामी करत होते. हे लोकांना मान्य नव्हते. राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले ते त्यांनी पाळले नव्हते. सत्ता आल्यावर योजना पूर्ण करायला पैसै नाहीत, असा खुलासा त्यांनी केला होता. मोदीजींच्या विचारांचा विजय आहे. येणाऱ्या निवडणुकीत ही जनता कॉंग्रेसला हद्दपार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
2024 च्या निवडणुकांमध्ये इंडिया अलायन्सचे पानिपत होईल. पंतप्रधान सर्व रेकॉर्ड तोडतील आणि पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. ईव्हीएम घोटाळयाचा आरोप करणाऱ्यांना त्यांनी राजस्थानमध्ये कॉंग्रेसने घोटाळा केला का असा प्रश्न विचारला.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतलं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. जनतेने पुन्हा एकदा भाजपाला भरभरुन मतं दिली आहे. 230 जागा असलेल्या मध्यप्रदेशमध्ये बहुमतासाठी 116 जागांची आवश्यकता असते. भाजपने 160 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 65 जागांवर अडकली आहे. मध्यप्रदेशमध्ये भाजपचं सरकार येणार निश्चित झालं आहे. पण शिवराज सिंह चौहान यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवणार की इतर कोणावर जबाबदारी सोपवणार याचा निर्णय लवकरच स्पष्ट होईल. तर राजस्थानमधील पहिला निकाल हाती आलाय. चोरासी मतदारसंघातून राजकुमार राओत विजयी झाले आहेत. भारत आदिवासी पार्टीचे राजकुमार हे 69 हजार 166 मतांनी विजयी झाले.