युती जाहीर होण्यापूर्वीच सेनेत नाराजीचा सूर 'मातोश्री'वर दाखल

निष्ठावंत जुनै शिवसैनिक आणि बाहेरून आलेले असे एकमेकांविरोधात उभे ठाकलेत

Updated: Sep 27, 2019, 10:26 AM IST
युती जाहीर होण्यापूर्वीच सेनेत नाराजीचा सूर 'मातोश्री'वर दाखल  title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : युती जाहीर होण्यापूर्वी होण्यापूर्वी आणि तिकीट वाटपापूर्वीच शिवसेनेत नाराजीला उधाण आलंय. नाराजीची ठिणगी पडलीय ती राजापूर आणि सोलापूरमधून... सोलापुरात तर निष्ठावंत विरूद्ध बाहेरून शिवसेनेत आलेले अशी थेट लढाई सुरू झाली असून हा वाद थेट मातोश्रीवरही पोहचलाय.

राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देवू नका, अशी मागणी तिथल्या स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केलीय. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी या पत्रात केलाय. तसंच साळवी आणि राणे पिता-पुत्रांमध्ये झालेल्या भेटीची क्लिपही मातोश्रीवर पोहचल्याचंही समजतंय. त्यामुळं येथून स्थानिक उमेदवार म्हणून विलास चाळके आणि सुधीर मोरे यांची नावे चर्चेत आहेत. 

सोलापूर शिवसेनेतही सर्वाधिक नाराजी दिसून येत आहे. इथं निष्ठावंत जुनै शिवसैनिक आणि बाहेरून आलेले असे एकमेकांविरोधात उभे ठाकलेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं तिथले सध्याचे शिवसेना आमदार नारायण आबा पाटील चांगलेच नाराज झालेत. मातोश्रीवर येवून त्यांनी आपली नाराजी कळवली असली तरी प्रसंगी त्यांनी अपक्ष लढण्याची तयारी ठेवल्यानं तिथं सेनेची डोकेदुखी वाढू शकते. 

तसंच सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातही काँग्रेसमधून आलेल्या दिलीप मानेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्यानं जिल्हाप्रमुख महेश कोठे नाराज झालेत. शिवसेनेच्या २१ पैकी १८ नगरसेवकांना सोबत घेवून त्यांनी मातोश्रीवर येत आपली ताकद दाखवून दिली.

सध्या भाजप शिवसेनेची चलती असल्यानं या काँग्रेस राष्ट्रवादीतील अनेकांनी या दोन्ही पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. तसंच आता युतीचा निर्णय झाल्यानंतर या दोन्ही पक्षांमध्ये नाराजांचे प्रमाण आणखी वाढून परिणामी बंडखोरांची पीकंही वाढणार, असं दिसतंय.