देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : वडाळा विधानसभा मतदार संघातून मीच आमदार होणार अशी घोषणा माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी केली आहे. युतीची घोषणा नुकतीच झाली असली असली तरी जागावाटपाचे सुत्र समोर आले नाही. या पार्श्वभुमीवर जाधव यांनी ही घोषणा केली आहे. वडाळा मतदार संघात काँग्रेसमधून भाजपात आलेले कालिदास कोळंबकर हे देखील आहेत. कोळंबकर यांच्याबद्दल स्थानिक शिवसैनिकांमध्ये रोष आहे. या पार्श्वभुमीवर जाधव यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
वडाळा विधानसभा मतदारसंघ शिवेसेनेलाच मिळावा यासाठी माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी मातोश्रीवर जाऊन शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी खासदार राहुल शेवाळेंसह वडाळा मतदारसंघातील सर्व पदाधिकारीही उपस्थित होते. वडाळा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला जाण्याची शक्यता असल्यानं स्थानिक शिवसैनिक नाराज होते. उद्धव ठाकरे यांची भेट घेत वडाळा मतदारसंघ भाजपाला न सोडण्याची विनंती श्रद्धा जाधव यांनी केली. वडाळा मतदारसंघातून श्रद्धा जाधव या निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
वडाळा मतदार संघ हा शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेचाच राहणार असे विधान जाधव यांनी केली आहे. यासंदर्भात पक्ष प्रमुख निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले. गद्दारांना धडा शिकवणार असल्याचा टोला देखील श्रद्धा जाधव यांनी लगावला आहे.