आदित्य ठाकरेंचं 'वरळी'ला पत्र

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे मुंबईतल्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

Updated: Oct 10, 2019, 06:16 PM IST
आदित्य ठाकरेंचं 'वरळी'ला पत्र title=

मुंबई : युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे मुंबईतल्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आदित्य ठाकरे यांनी वरळीच्या मतदारांना खुलं पत्र लिहिलं आहे. लोकसहभागातून वरळीचा विकास घडवू असं आदित्य ठाकरे या पत्रात म्हणाले आहेत. वरळीतील वाहतुकीचा प्रश्न, झोपडपट्टी, बीबीडी चाळींचा पुनर्विकास यावर प्रमुख भर देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. तसंच वरळीला ए प्लस बनवण्याचा विडा उचललाय. त्यासाठी वरळीकरांनी साथ द्यावी, असं आवाहन त्यांनी खुल्या पत्रात केलं आहे.

काय आहे आदित्य ठाकरेंच्या पत्रात?

वरळीबद्दलचं माझं स्वप्न साधं सरळ आहे. आजवर न ऐकलेला वरळीतला प्रत्येक आवाज ऐकणं. वरळीला विध्वंस मान्य नाही. वरळीला हवा आहे, तो शाश्वत विकास. हे स्वप्न साकार करण्यासाठी कुटुंब, मित्र, सहकारी, आणि शहर विकासतज्ज्ञ माझ्या मदतीला आहेत. आपल्या सर्वांच्या सहभागातूनच मी वरळीला A+ दर्जा मिळवून देईन. जिथे जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध असतील. काम तर खूप आहेच.

वाहतुकीचा प्रश्न, झोपडपट्टी, बीडीडी चाळींचा पुनर्विकास, खेळांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा आणि रस्त्यांवरून चालणाऱ्यांसाठी पादचरी पथ आणि बरंच काही. कोळीवाड्यातील पर्यटनापासून ते व्यस्त असणारी नुकतीच उघडलेली शॉपिंग आणि कमर्शियल मिल कंपाऊंड यांना सुधारित करणं. अगदी इथल्या हिरव्या मोकळ्या जागा आणि शांत रस्त्यांपासून ते टेकडीपर्यंत. या सगळ्या गोष्टी जगाला दिसतील, आणि म्हणूनच मी म्हणालो त्याप्रमाणे, वरळी आणि वरळीची संस्कृती जगाला दाखवायला तयार राहा. वरळीमध्ये काम करण्यासाठी प्रत्येक दिवशी एक नवी संधी असेल. चला तर एकत्र येऊया आणि बनवूया वरळी A+.