अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर आशिष शेलारांना सुचली कविता

अजित पवारांच्या तडकाफडकी राजीनाम्याच्या बातमीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली

Updated: Sep 28, 2019, 11:29 AM IST
अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर आशिष शेलारांना सुचली कविता title=

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे अजित पवारांनी राजीनामा सोपवला. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या राजीनाम्याबाबत प्रत्यक्ष त्यांचे काका आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, तसंच संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच अंधारात असल्याचं दिसून आलं. अजित पवारांच्या तडकाफडकी राजीनाम्याच्या बातमीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अनेकांनी आपल्याला या राजीनाम्याचा धक्का बसल्याचं म्हटलं तर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवत अनेक चर्चांना सुरूवात केली. पण, भाजपाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना मात्र अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर कविता सुचली. ही कविता त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलीय.

#महाजनादेश असा हॅशटॅग वापरत 'काहीतरी घडतंय... काहीतरी बिघडतंय...' असं म्हणत त्यांनी बरंच काही सूचित केलंय.


आशिष शेलार यांचं ट्विट

 

कुठे आणि का गायब झाले अजित पवार?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यनंतर अजित पवार नॉटरिचेबल झाले. त्यांचा फोनही बंद आहे. त्यामुळे ते नेमके कुठे गेले? याबाबत काहीच माहिती मिळत नाही. खुद्द शरद पवारांचाही त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. पुण्यातल्या भोसले नगरमधल्या जिजाई बंगल्यात शांतता आहे. अजित पवार घरी नसल्याचं सांगण्यात आलंय. मग अजित पवार नेमके आहेत तरी कुठे असा प्रश्न निर्माण होतोय. अजित पवार स्वत: येऊन आपली भूमिका का मांडत नाही? काही गंभीर कारण असल्यामुळे अजित पवार गप्प आहेत का? या सगळ्यासंदर्भात खुलासा का करत नाही असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.