मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. ४१ परदेश दौऱ्यांसाठी तब्बल ३५५ कोटींचा खर्च करण्यात आलाय. मोदी यांनी पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यापासून अनेक विक्रम मोडीत काढले आहेत, असे त्यांच्या भक्तांकडून सांगितले जाते. अशात त्यांच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने याबाबत आपला अधिकृत फेसबूक पेजवर 'पंतप्रधान मोदींचा आणखी एक विक्रम' अशी पोस्ट टाकलेय.
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी ४१ परदेश दौरे केले असून या दौऱ्यांवर ३५५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. माहिती अधिकारांतर्गत ही बाब समोर आली आहे. गेल्या चार वर्षांमध्ये मोदी एकूण १६५ दिवस परदेशात होते. आता आहे की नाही हा देखील एक विक्रमच?, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.
बंगळुरुमधील माहिती अधिकार कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे, त्यावर होणारा खर्च याबाबतची माहिती मागवली होती. पंतप्रधान कार्यालयाने यावर उत्तर दिले आहे. गेल्या चार वर्षांमध्ये मोदींनी ४१ परदेश दौरे केले. यात त्यांनी ५० देशांना भेटी दिल्याचे म्हटले आहे.