'आयफोन 12 प्रो'च्या बदल्यात CBI अधिकाऱ्याकडून अनिल देशमुखांचा चौकशी अहवाल लीक, सूत्रांची माहिती

अनिल देशमुख यांच्या वकिलांच्या चौकशीत ही माहिती उघड झाल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे

Updated: Sep 3, 2021, 10:25 PM IST
'आयफोन 12 प्रो'च्या बदल्यात CBI अधिकाऱ्याकडून अनिल देशमुखांचा चौकशी अहवाल लीक, सूत्रांची माहिती title=

मुंबई : 100 कोटींच्या वसुलीप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे. 14 एप्रिलला अनिल देशमुख यांची सीबीआयनं चौकशी केली. त्यानंतर 21 एप्रिलला याप्रकरणात FIR दाखल करण्यात आला. सुत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणाशी संबंधित माहिती आणि गोपनीय दस्तऐवज CBI सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांनी लीक केल्याचा आरोप आहे. त्यांनी अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून iPhone 12 Pro घेतला आणि याच फोनच्या माध्यमातून त्यांनी गोपनीय माहिती पुरवली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

14 एप्रिल रोजी अनिल देशमुख यांची चौकशी केल्यानंतर, सीबीआयने 16 एप्रिलला वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपला तपास अहवाल सादर केला. त्यानंतर कायदेशीर अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर 21 एप्रिल रोजी या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आला. या तपासाशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि महत्त्वाची माहिती अभिषेक तिवारी यांच्याकडेही होती आणि तपासादरम्यानच अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांच्या संपर्कात आले.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक तिवारी 28 जून रोजी पुण्याला तपासासाठी गेले जेथे वकील आनंद डागा यांनी आयफोन 12 प्रो लाच म्हणून दिला आणि त्या बदल्यात तपासाशी संबंधित सर्व माहिती मागितली. जी अभिषेक तिवारी पूर्ण करत राहिले. अभिषेकने या आयफोनवरून तपासाशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाची कागदपत्रं अनिल देशमुख यांच्या वकीलाला व्हॉट्सअॅपद्वारे पाठवल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा आणि जावई गौरव चतुर्वेदी यांनी सीबीआयचा अंतर्गत अहवाल लीक केला नसता तर हे प्रकरण उघडकीस आलं नसतं. वकील आणि देशमुख यांचे जावई गौरव यांना वाटले होतं की, अहवाल लीक झाल्यावर प्रकरण त्यांच्या बाजूने जाईल. पण यानंतर अनिल देशमुख यांच्या वकिलांच्या तपासात हा कट उघडकीस आला.

सीबीआयने अभिषेक तिवारी आणि वकील आनंद दिलीप डागा यांना अटक केली आहे. या प्रकरणी अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांचीही चौकशी करण्यात आली.