Rutuja Latke : ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांची किती आहे संपत्ती ?

Andheri Vidhan Sabha By-election 2022 : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. ठाकरे गटाकडून  ऋतुजा लटके आणि भाजपा-शिंदे गट युतीकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

Updated: Oct 16, 2022, 11:59 AM IST
Rutuja Latke : ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांची किती आहे संपत्ती ? title=

 Rutuja Latke wealth and Latke Family Property : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना-भाजप युती अशा दोन गटात ही निवडणूक होणार आहे. ठाकरे गटाकडून  ऋतुजा लटके (Rutuja Latke ) आणि भाजपा-शिंदे गट युतीकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

ऋतुजा लटके कोण आहेत?

ऋतुजा लटके (Rutuja Latke) या अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. ऋतुजा लटके या पदवीधर आहेत. त्या मुंबई महापालिकेत क वर्ग श्रेणीतील कर्मचारी होत्या. त्यांनी निवडणुकीसाठी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. परंतु निवडणूक अर्ज भरण्याआधी ऋतुजा लटके या कधीही राजकारणात सक्रिय नव्हत्या. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे हदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर अंधेरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

ऋतुजा लटके यांच्या उमेवारी अर्ज भरण्याच्या दिवशी  जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते मैदानात उतरले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतरची ही पहिली निवडणूक होत आहे, त्यामुळे या निवडणुकीचे उत्सुकता आहे. 

ऋतुजा लटके यांच्यासाठी कसोटी?

ऋतुजा लटके यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. कारण त्या आपल्या पतीच्या निधनानंतर त्यांचा पुढचा वारसा पुढे चालवणार आहेत. त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. यावेळी ऋतुजा लटके यांनी त्यांचे निवडणूक शपथपत्र सादर केले आहे. यात त्यांच्या संपत्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार, ऋतुजा लटके यांच्याकडे एकूण सुमारे 43 लाख 89 हजार 504 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर सुमारे 51 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांचे दि्वंगत पती रमेश लटके यांच्या नावावर 22 लाख 58 हजारांची जंगम मालमत्ता, तर 8 कोटी 3 लाखांची स्थावर मालमत्ता आहे. (Rutuja Latke wealth and Latke Family Property)

ऋतुजा लटके यांची किती आहे संपत्ती? (Rutuja Latke wealth)

ऋतुजा लटके यांनी 2021-22 मधील उत्पन्न 3 लाख 99 हजार रुपये दाखवले आहे. त्यांच्याकडे रोख रक्कम 75 हजार रुपये आहे. तर वेगवेगळ्या बँकांमध्ये सुमारे 3 लाखांच्या ठेवी असल्याचे म्हटले आहे. तर  5 लाख 98 हजार रुपयांची गुंतवणूक ही शेअर्स आणि मुच्युअल फंडात आहे. तर राष्ट्रीय बचत योजना, डाक योजना आणि अन्य योजनांत 11 लाख 11 हजार 142 रुपयांची गुंतवणूक आहे.

ऋतुजा लटके यांची एकूण जंगम मालमत्ता सुमारे 43 लाख 89 हजार 504 रुपये. यात सोनेचांदी आणि मौल्यवान वस्तूंची किंमत 11 लाख 48 हजार रुपये आहे. तर स्थावर मालमत्ता सुमारे 51 लाख रुपये किंमतीची आहे. तर ऋतुजा यांच्यावर 15 लाख 29 हजार रुपयांचे कर्ज आहे. तर पती रमेश लटके यांच्यावरील 2 कोटी 4 लाख कर्ज आहे.