Maharashtra Politics : 'हे' 7 ट्विस्ट ज्यामुळे अंधेरी पोटनिवडणूक कायम लक्षात राहील

Andheri By Poll Election साधी पोटनिवडणूक महाराष्ट्रात का गाजली.. वाचा निवडणुकीमागचं राजकारण

Updated: Nov 5, 2022, 05:12 PM IST
Maharashtra Politics : 'हे' 7 ट्विस्ट ज्यामुळे अंधेरी पोटनिवडणूक कायम लक्षात राहील title=

अनिकेत पेंडसे, झी मीडिया, मुंबई : राज्याच्या राजकारणात बहुचर्चित ठरलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीचा (Andheri By Poll Election) रविवारी निकाल लागणार आहे. शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदानसंघाच्या पोटनिवडणुकीत गुरुवारी मतदान झालं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून (SSUBT) ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे शिवसेना पहिल्यांदाच 'धनुष्यबाण' चिन्हाऐवजी 'मशाल' या निवडणूक चिन्हावर लढत आहे.

पोटनिवडणुकीतले 'ते' 7 ट्विस्ट
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अंधेरी पोटनिवडणुकीच्या माध्यमातून पहिल्यांदाच शिंदे-ठाकरे (Shindve vs Thackeray) थेट सामना रंगणार होता. शिंदे-भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार होती.  पण या निवडणुकीत 7 ट्विस्ट आले ज्यामुळे सारं चित्र पालटलं.. 

भाजपची उमेदवारी, शिंदे गटाची चुप्पी
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजप-शिंदे गट आगामी प्रत्येक निवडणूक एकत्र लढेल अशी घोषणा करत होता. पण अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल (Muraji Patel) यांना उमेदवारी देण्यात आली. मुरजी पटेल यांनी वाजत गाजत शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्जही दाखल केला पण तरीही शिंदे गटाकडून निवडणूक लढण्यावर चर्चा सुरु आहे अशीच भूमिका शेवटपर्यंत घेण्यात आली.

मशाल चिन्हाचा फैसला
शिवसेनेच्या धनुष्यबाण निवडणूक चिन्हाचा फैसला याच कालावधीत झाला. तीन दशकं शिवसेनेचं निवडणूक चिन्हं असलेलं धनुष्यबाण चिन्ह याच काळात गोठवलं गेलं. निवडणूक आयोगासमोर रंगलेल्या कायदेशीर लढाईनंतर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्ह देण्यात आलं. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल-तलवार चिन्ह मिळालं. भलेही या निवडणुकीत शिंदे गटानं उमेदवार दिला नव्हता. पण याच निवडणुकीचा दाखला देत चिन्ह आणि पक्षाच्या नावाचा निकाल जलद गतीनं देण्यासाठी आयोगासमोर दबाव वाढला हे नक्की..

लटकेंचा राजीनामाप्रकरण हायकोर्टात
ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा राजीनामा मुंबई महापालिकेकडून मंजूर करण्यात आला नाही. लटकेंच्या दोन राजीनामा पत्रांचा वाद हायकोर्टात गेला. अखेर हायकोर्टानं मुंबई महापालिकेला राजीनामा मंजूर करण्याचे आदेश दिल्यानंतर हा वाद संपला. त्यादरम्यान महापालिका लिपीक असणाऱ्या लटकेंनी लाच घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता.

राज ठाकरेंचं पत्र, पवारांचं आवाहन
याचदरम्यान अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी अशी भूमिका मांडत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. शरद पवारांनीही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी अशी भूमिका मांडली. त्यानंतर घडामोडींना वेग आला.

भाजपची माघार, ठाकरेंना दिलासा
राज ठाकरे आणि शरद पवारांच्या आवाहानानंतर भाजपनं अचानक निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. मुरजी पटेल यांनी माघार घेतली. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला. ही निवडणूक म्हणजे मुंबई महापालिकेची लिटमस टेस्ट समजली जात होती. शिंदे-भाजप या निवडणुकीत हरले असते तर ठाकरे गटाचं मनोबल वाढलं असतं, शिवसैनिकांना मॉरल बुस्ट मिळाला असता आणि परसेप्शनच्या लढाईत ठाकरे जिंकले असते म्हणून भाजपनं माघार घेतल्याचं कवित्व यावेळी रंगलं.

पोटनिवडणूकच रद्द करण्यासाठी अर्ज
भाजपनं माघार घेतल्यानंतर निवडणूक सुरळीत होईल असं वाटत होतं पण अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी निवडणूक रद्द करण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ऋतुजा लटकेंकडून आपल्यावर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप कांबळेंनी केला.

'नोटा'वरुन प्रचार
याचदरम्यान नोटाला मतदान करा, लटकेंना मतदान करु नका असा प्रचार करणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. नोटाला मतदान करण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप अनिल परब यांच्याकडून करण्यात आला. एकंदरीतच अंधेरीची पोटनिवडणूक अनेक ट्विस्टनं भरलेली ठरली. मुंबई महापालिकेची सेमीफायनल म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात होतं. अर्थात भाजपनं माघार घेतल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार नाहीये. पण या निवडणुकीत आलेल्या ट्विस्टमुळे एक साधी पोटनिवडणूक साऱ्या महाराष्ट्रभर गाजली हे नक्की.