अनिल जयसिंघानीचा शिवसेना प्रवेश? उद्धव ठाकरेंबरोबरचा फोटो व्हायरल... ब्लॅकमेल प्रकरणात ट्विस्ट

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाप्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आता यात नवा ट्विस्ट आला आहे. अनिक्षाचे वडील अनिल जयसिंघानी यांचा उद्धव ठाकरेंबरोबरचा एक फोटो व्हायरल झाला आहे

Updated: Mar 17, 2023, 09:31 PM IST
अनिल जयसिंघानीचा शिवसेना प्रवेश? उद्धव ठाकरेंबरोबरचा फोटो व्हायरल... ब्लॅकमेल प्रकरणात ट्विस्ट title=

Who Anil Jaisinghani : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांना ब्लॅकमेल करण्याच्या आरोपात अटकेत असलेल्या अनिक्षा जयसिंघानीला (Aniksha Jaisinghani) 21 मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आलीय. मुंबई सेशन कोर्टानं (Mumbai Session Court) जयसिँघानीला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. अमृता फडणवीसांना लाच देण्याचा प्रयत्न आणि धमकी दिल्याप्रकरणी आरोपी अनिक्षा अनिल जयसिंघानीला डी बी मार्ग पोलिसांनी अटक केली होती. 

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
अमृता फडणवीस यांनी अनिक्षाबरोबर तिचे वडिल अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) यांच्याविरोधाताही तक्रार दाखल केली आहे. अनिल जयसिंघानी हा 5 राज्यात वॉन्टेड आहे, इतकंच नाही तर 8 वर्षांपासून तो फरार असल्याची माहिती आहे. आता अनिल जयसिंघानी याचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल (Viral Photo) झाला असून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अनिल जयसिंघानी याचा ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंबरोबरचा (Uddhav Thackeray) एक फोटो समोर आला आहे. 

शिवसेनेत केला होता प्रवेश?
अनिल जयसिंघानिया यानं 2014मध्ये शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला होता. शिवसेना पक्ष प्रवेशाचे त्याचे फोटो आता सोशल मीडियात व्हायरल झालेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यानं शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याआधी 2002 मध्ये तो उल्हासनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक म्हणून निवडून आला होता. तर 1995 आणि 1997 मध्ये त्यानं काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.. अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी गुरुवारी त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानिया हिला अटक केलीय... तर अनिल जयसिंघानिया अनेक महिन्यांपासून फरार आहे.

कोण आहे अनिल जयसिंघानी?
अनिल जयसिंघानी हा क्रिकेट बुकी आहे. 5 राज्यात 17 गुन्हे त्याच्या नावावर दाखल आहेत. गेल्या 8 वर्षांपासून तो फरार आहे. सट्टेबाजी प्रकरणात अनिल जयसिंहानीला तीन वेळा अटक करण्यात आली आहे. इतकंच नाही तर गोवा पोलिसांनी 11 मे 2019 रोजी अनिल जयसिंघानी याच्याविरोधात लुकआऊट नोटीसही जारी केली होती. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार आठ वर्षांपूर्वी 2015 मे मध्ये गुजरात ईडीने जयसिंहानी याच्या दोन घरांवर छापा मारला होता. त्याच्याविरोधात मनी लॉण्ड्रींग प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला.