मुंबई: मुंबईतील अमेरिकन वकीलातीत नुकतेच रुजू झालेले डेव्हिड रँझ यांनी 'झी २४ तास'च्या बाप्पाचं दर्शन घेऊन भारतातील आपल्या कामाचा श्रीगणेशा केला. 'झी २४ तास'च्या कार्यालयात येऊन रँझ यांनी बाप्पाची आरती केली. त्यानंतर त्यांनी 'झी २४ तास'च्या प्रतिनिधींशी विविध विषयांवर चर्चा केली. २६ ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारल्यावर रँझ प्रथमच भारतीय माध्यमांसमोर आले.
यावेळी झी २४ तासचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांच्यासह अमेरिकन वकिलातीचे मोजके अधिकारी आणि झी २४ तासचे कर्मचारी उपस्थित होते. डेव्हिड रँझ हे गेली अनेक वर्ष वॉशिंग्टनमध्ये दक्षिण आशियाई देशाच्या परराष्ट्र धोरणात विशेष भूमिका बजावत आहेत. याआधी रँझ यांनी जेरुसलेम, मोरोक्को, कैरो आणि बगदाद मध्ये काम केले आहे. येत्या काळात भारत-अमेरिका संबंध आणखी वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रँझ यांनी सांगितले.