मुंबई : तौक्ते वादळामुळे बुडालेल्या बार्ज पी ३०५ बेकायदेशीर रित्या तेल उत्खन्न करत होते.या तेल उत्खननाची परवानगीच नव्हती. बार्ज वरील मृत्यू पावलेल्या ७० हून आधिक लोकांचा अतिलालचीपणामुळे कोल्ड ब्लडेड मर्डर झाला आहे असा मनसेने गंभीर आरोप केला आहे.
पी ३०५ चे संचालन करणाऱ्या एफकॉन्स आणि जहाज मालकावर तसेच कामात कसूर करणाऱ्या शिपिंग महासंचालक आणि ओएनजीसीवर कारवाईची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनेने मुंबई पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
समुद्रात ONGC साठी तेल उत्खननाचे काम करत असलेल्या पी३०५ तराफा व इतर जहाजातील झालेले मृत्यू हे तौक्ते वादळामुळे नाही तर तराफा मालक आणि संचालन करणाऱ्या एफकॉन्सच्या निष्काळजीपणामुळे झाले आहे असा घणाघाती आरोप मनसे नाविक सेनेचे कार्याध्यक्ष निशांत गायकवाड यांनी केला आहे.
या घटनेमुळे केवळ जहाजच नाही तर पर्यावरणाचेही मोठे नुकसान झाले आहे. भारतीय हवामान खाते सर्वप्रथम समुद्रातील संस्थांना बदलत्या हवामानाविषयी जागरूक करत असते. तौक्तेवेळीही हेच झाले.
ओएनजीसी सोबत किंवा ओएनजीसी साठी काम करत असणाऱ्या एल&टी व इतर कंपन्यांनी आपली जहाजे, तराफे १५ तारखे पर्यंत किनाऱ्यावर आणलेली असताना केवळ एफकॉन्स संचलन करत असलेलीच जहाजे समुद्रात का राहिली हा सवाल आहे.
मनसे कडून देण्यात आलेल्या माहिती नुसार
दिवसावर पगार असल्याने अधिक नफा कमवण्यासाठी पी ३०५ अंतिम क्षणापर्यंत समुद्रात होते. पी-३०५ हे एक स्वत:हून न हलू शकणारे अपंग बार्ज आहे. त्यामुळे ते किनाऱ्यावर पोहचले की नाही हे तपासण्याची जबाबदारी ओएनजीसी, शिपिंग महासंचालक, एफकॉन्स आणि कंपनी मालक या चारहींची होती.
परंतु या चौघांपैकी दोघांनी म्हणजे बार्ज मालक व एफकॉन्सने आधिक नफा कमवण्यासाठी सुचनांकडे पाठ फिरवली तर ओएनजीसी व शिपिंग महासंचालकांनी पाठपुरावा करण्याची तसदी घेतली नाही.
दुसरी धक्कादायक बाब म्हणजे-
पी ३०५ ला तेल उत्खननासाठी भारतीय नौदलाच्या ODAG विभागाकडून NSE परवानगी घ्यावी लागते. एफकॉन्सला मिळालेल्या या NSE परवानगीची मुदत संपलेली होती. साहजिकच तेलक्षेत्रात काम करण्याचा अधिकार त्यांनी गमावलेला होता. मात्र तरीही त्यांनी तेलक्षेत्रात अतिक्रमण केले आणि आपले व्यावसायिक काम चालू ठेवले.